गडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या सूरजागड पहाडीवर उच्चप्रतीचे लोह खनिज असल्याने येथे खासगी कंपन्यांना उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र माओवाद्यांकडून असलेला धोका लक्षात घेता, कंपनीला सुरक्षा पुरवण्यासाठी सभोवताल पोलीस ठाण्यांचे जाळे वाढवले जात आहे. त्यानुसार शनिवारी एटापल्ली तालुक्यात आलदंडी येथे नवे पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले.या केंद्रामुळे सूरजागड पहाडीवरून लोह खनिजाची वाहतूक करण्यासाठी आता मोठे पोलीस बळ उपलब्ध होणार आहे. यापूर्वी गेल्या दीड वर्षात एटापल्ली तालुक्यात हालेवारा, कोटमी, हेडरी, बुर्गी, येलचिल, आलदंडी ही नवे पोलीस ठाणी निर्माण करण्यात आली. डिसेंबर महिन्यात नक्षलवाद्यांनी सूरजागड पहाडीवर ७९ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर बराच काळ खननाचे काम बंद राहिले होते. या पार्श्वभूमीवर सूरजागड पहाडीवरही आणखी एक पोलीस कॅम्प उभारला जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मायनिंग कंपन्यांसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था
By admin | Published: April 24, 2017 3:05 AM