तळवडे : आकुर्डी येथील रेल्वेस्थानक हे शहरातील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. या परिसरात पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेज आहे. तसेच परिसरातून पुण्यातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणारे तरुण-तरुणी, तसेच पुणे आणि लोणावळा परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणारे कर्मचारी, मावळ परिसरातून पिंपरी-चिंचवड परिसरात दुधाचा रतीब घालण्यासाठी येणारे गवळी येत असतात.आकुर्डी रेल्वे स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येते.सुरक्षेसाठी येथे ना रेल्वे पोलीस, ना सुरक्षारक्षक, ना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच अशी परिस्थिती असल्यामुळे पाकीटमार गर्दीत घुसून पाकीट चोरून पसार होत असतात. अशा प्रकारामुळे गुन्हेगारी वाढत असल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वेतून उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी काही प्रवासी जीवघेणा प्रयत्न करत असतात. काही धावत्या रेल्वेतून उडी मारतात, तर प्रवासात बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे चढताना पडून कित्येक प्रवासी जखमी झाले आहेत. तरीही जीवावर उदार होऊन काही तरुण असे धाडस करताना आढळून आले. आकुर्डी रेल्वेस्थानकावर प्रवेशद्वार, सार्वजनिक स्वच्छता गृह, रेल्वे फलाट, पादचारी पूल आदी परिसरात मोकट कुत्री वावरत असतात. यामुळे प्रवाशांना अडचण जाणवते.शहरातील शैक्षणिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून आकुर्डीची ओळख आहे. येथील रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हे विद्यार्थी रेल्वे रुळावरुन चालण्याचा जीवघेणा खेळ खेळत असून, हा खेळ जिवावर बेतू शकतो, याची कल्पना असूनही कित्येक तरुण धाडसी खेळ करत असतात.रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या वाहनतळाची सोय आहे. सदर ठिकाणी वाहन लावण्यासाठी शुल्क आकारले जाते. परंतु वाहनांचे ऊन आणि पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत नाही, तसेच सुरक्षेसाठी वाहनतळाच्या कडेने सीमाभिंत नसल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.पादचाऱ्यांसाठी रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे जाण्यासाठी उड्डाणपूल असूनही सर्रासपणे प्रवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रुळावरूनच ये-जा करीत असतात. अशा प्रवाशांना मज्जाव करण्यासाठी, तसेच दंडात्मक कारवाई करण्यासाठी येथे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे येथील प्रवासी बिनदिक्कतपणे रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालत असतात. यात रेल्वे कर्मचारीही आघाडीवर असल्याचे आढळून आले.प्रवाशांसाठीच्या बाकावर गर्दुले झोपलेले असतात. भिकारीही गलिच्छपणे जागोजागी भीक मागत असतात. प्रवाशांना बसण्यासाठी जाग कमी पडते यामुळे त्यांना इतर अडगळरच्या ठिकाणी बसावे लागते.पादचारी उड्डाण पुलाच्या पायऱ्यांची दुरवस्था झाली असून, त्या उतरत्या वेळी वृद्ध आणि अंध प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे या पायऱ्यांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)>रेल्वे परिसरात अग्निशामक यंत्रणा कालबाह्य झालेली आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी बादलीत वाळू ठेवलेली आहे. ही यंत्रणा कालबाह्य झालेली आहे. तसेच रेल्वे स्थानकावर मद्यपान करून बेधुंद अवस्थेतील मद्यपी येथील आवारात भटकत असतात. तसेच काही मद्यपी आडोशाचा आसरा घेऊन झोपलेले असतात. त्यामुळे रेल्वे स्थानक अशा मद्यपींचा अड्डा बनला असल्याचे दिसून येते. या स्थानकावरुन महाविद्यालयीन तरुणींचा ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. अनेकवेळा काही विकृत लोकांकडून मुलींना त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे स्थानकावर महिला मोलीस कर्मचारी तैनात असावेत, अशी विद्यार्थिनींकडून माहणी केली जात आहे.
आकुर्डी स्थानकाची सुरक्षा रामभरोसे
By admin | Published: January 18, 2017 1:47 AM