नवी मुंबई : खाडीकिनाऱ्यांचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळ विकसित करण्याची सिडकोसह पालिकेची योजना बारगळली आहे. याचा गैरफायदा माफियांनी घेतला असून जागा मिळेल तिथे डेब्रिज टाकले जात आहे. शिवाय सारसोळेपासून बेलापूरपर्यंत खाडीकिनारी मद्यपींसह गर्दुल्ल्यांचे अड्डे तयार झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पामबीच रोडवर सारसोळेजवळ खाडीकिनारी भूखंड क्रमांक ३० सार्वजनिक मैदानासाठी राखीव ठेवला आहे. पण प्रत्यक्ष मैदान उभारण्याचे काम झालेच नाही. हा परिसर कांदळवनामध्ये येत असल्याने मैदान फक्त नामफलकापुरतेच मर्यादित राहिले आहे. या परिसरामध्ये रोज सायंकाळी मद्यपींची गर्दी असते. दगडी चूल पेटवून जेवण बनविले जाते. सकाळी भंगार उचलणाऱ्यांना येथून ४० ते ५० दारूच्या बॉटल सापडू लागल्या आहेत. प्रकल्पग्रस्त नागरिक येथून खाडीमध्ये मासेमारीसाठीही जात असतात. त्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. पण या रस्त्याचा वापर डेब्रिज माफियांच्या पथ्यावर पडला आहे. रात्री या परिसरात डेब्रिज टाकले जात असून वेळेत संबंधितांवर कारवाई केली नाही तर येथेही अनधिकृतपणे डेब्रिजचे डंपिंग ग्राउंड तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनविभागाने येथे दोन सूचना फलक लावले आहेत, पण त्याव्यतिरिक्त सुरक्षेसाठी काहीही तरतूद केलेली नाही. महापालिका व सिडकोही या परिसरातील डेब्रिजचे अतिक्रमण रोखण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. पोलीस प्रशासनही मद्यपींवर कारवाई करत नाही. मद्यपींना वेळेत आवर घातला नाही तर भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पामबीच रोड व खाडी यांच्या मध्ये असणारे कांदळवन नष्ट करण्याचे षङ्यंत्र शहरात सुरू आहे. कांदळवन नष्ट झाले तर या परिसरात इमारतींचे बांधकाम करता येणार आहे. याचसाठी डेब्रिज माफियांच्या आडून मँग्रोज नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने बांधकामाचा कचरा या परिसरात टाकला जात आहे. सारसोळे खाडीप्रमाणे टी. एस. चाणक्य व एनआरआयच्या बाजूलाही अशीच स्थिती आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे. या रोडने खाडीपर्यंत जावून तेथे रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. मद्यपींमध्ये भांडणे होवून किंवा दोन गटांत मतभेद होवून खून, मारामारी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय या मुंबईतील शक्ती मिलप्रमाणे दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे. कोणतीही अनुचित घटना होण्यापूर्वीच पालिका, सिडको, वनविभाग व पोलिसांनी ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)मैदान तयार करावेसिडकोने सारसोळे सेक्टर ६ पामबीच रोडला लागून भूखंड क्रमांक ३० मैदानासाठी राखीव ठेवला आहे. याविषयी सूचना फलक मुख्य रोडवर लावण्यात आला आहे. पण मैदान विकसित करण्यात अनेक अडचणी असल्याने प्रत्यक्ष काहीही कामे केलेली नाहीत. याचा गैरफायदा घेवून मैदानावर डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. डेब्रिजचे डंपिंग ग्राउंड करण्यापेक्षा मैदान विकसित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दोन गोणी दारूच्या बॉटलसारसोळे खाडीकिनारी पाहणी केली असता तेथे भंगार गोळा करणारी व्यक्ती दारूच्या मोकळ्या बॉटल घेवून जात होती. किती बॉटल सापडतात असे विचारले असता त्याने सांगितले की, रोज २ गोणी बॉटल सापडतात. रविवार व इतर सुटीदिवशी जास्तच सापडत असल्याचे सांगितले. यावरून येथील परिस्थिती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे.
खाडीकिनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावर
By admin | Published: April 05, 2017 2:52 AM