मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासह ४० हून आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. याशिवाय, काल अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसेच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्राने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील १५ बंडखोर आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या यादीत असलेले आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. याशिवाय, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. वैजापूरमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे. तसेच, आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शनिवारी एकनाथ शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला काळे फासले आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात येत आहे. अशात कुटुंबीयांना धोका असल्याची तक्रार काही आमदारांनी केली होती. यानंतर केंद्राने आमदारांच्या कुटुंबीयांना आज संध्याकाळपासून सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमदार तळ ठोकून आहेत. दरम्यान, या आमदारांचे संरक्षण राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र, कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा दावा राज्यातील गृहविभाकडून केला होता.
दुसरीकडे, बंडखोर आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, आता या कारस्थानामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात आहे. आता केंद्राची ढवळाढवळ महाराष्ट्राला कळली आहे, असेही अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.