मुंबई : राज्य सरकारने मविआच्या पक्षांमधील माजी मंत्री व नेत्यांची अतिरिक्त सुरक्षा काढली आहे. त्यात बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, नाना पटोले, जयंत पाटील आदींचा समावेश आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढविण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आमदार असले तरी गडचिरोलीत घर असलेले आणि या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सातत्याने जाणारे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची वाय प्लस सुरक्षा काढण्यात आली. त्यांनी आपली सुरक्षा कायम ठेवावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. मिलिंद नार्वेकर यांना आधी एक्स सुरक्षा होती, आता ती वाय प्लस करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
ज्या लोकप्रतिनिधींची वाढीव सुरक्षा काढण्यात आली त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून देय असलेली सामान्य सुरक्षा तेवढी दिली जाईल. यापूर्वी बहुतेकांना वाय प्लस सुरक्षा होती. आम्हाला सुरक्षेची गरज नाही असे सरकारला वाटले असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. माझी सुरक्षा काढलेली असताना माझ्या घरावर हल्ला झाला, तरीही अद्याप मला सुरक्षा पुरविलेली नाही, असा आरोप माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला.
कोणत्या नेत्यांची सुरक्षा काढली?छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनील केदार, खासदार डेलकर परिवार, वरुण सरदेसाई.सध्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी ज्यांचा वाद रंगत आहे ते बडनेराचे आमदार रवि राणा यांना वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.