मुंबई - उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्याची माहिती समोर आली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केल्याचं कळताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना आता झेड प्लसऐवजी झेड सुरक्षा देण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरे यांची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाईल. परंतु या बातमीवर आता मुंबई पोलिसांकडूनही कुठलीही सुरक्षा कमी केल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यात जी अतिरिक्त वाहने होती ती हटवली असल्याचे म्हटलं आहे.
राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं. परंतु पोलीस सूत्रांनुसार, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात अधिक वाहने होती आणि मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांच्याकडील ही वाहने प्रोटोकॉलनुसार काढून घेतली. उद्धव ठाकरेंना कालही झेड प्लस सुरक्षा होती आणि आजही आहे असं त्यांनी सांगितले.
तर ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना वाय प्लस-स्कॉट कॅटेगिरीची सुरक्षा दिलेली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कुटुंबाला कॉनवॉय म्हणून १-१ वाहन अतिरिक्त देण्यात आले होते. ती ३ वाहने सध्या हटवण्यात आली आहे. परंतु सुरक्षेच्या दर्जात कमी केली नाही. अलीकडेच राज्यातील मोटार परिवहन विभागाकडून अतिरिक्त गाडी परत मागितल्याचे पत्र प्राप्त झाले त्यानंतर या अतिरिक्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत.
विनायक राऊतांनी साधला निशाणाअख्ख्या जगातील दहशतवादी आहेत त्यांच्या हिटलिस्टवर मातोश्री आहे. वर्षानुवर्षे मातोश्रीला सुरक्षा होती, वेळोवेळी ती वाढवण्यात आली होती. परंतु राज्यात गद्दारांचे सरकार आल्यानंतर आजपासून मातोश्रीचे मुख्य प्रवेशद्वार ते आतपर्यंत खूप मोठ्या संख्येने कपात केली आहे. द्वेष आणि घाणेरड्या राजकारणामुळे ही सुरक्षा कमी करण्यात आली. दुसरीकडे ठाण्यात नगरसेवक, त्यांच्या पत्नीला, पीएलाही सुरक्षा देण्यात आली आहे. गद्दारांना सुरक्षा दिली जाते पण मातोश्रीची सुरक्षा कपात केली जाते हा निदंनीय प्रकार आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.