मुंबई : एकीकडे आमच्या आमदारांची घरे, कार्यालयांवर काही लोक हल्ले करत असताना राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबांना असलेली सुरक्षा काढून घेतली असल्याचा आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसे पत्र शिंदे गटाच्या ३७ आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिले. मात्र, अशी कोणतीही सुरक्षा काढलेली नाही, असा खुलासावळसे-पाटील यांनी केला आहे.
शिंदे यांनी आरोप केला की, आता रडीचा डाव सुरू झाला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने असे केले जात आहे. आम्ही अजूनही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवू नका. आम्ही गट करतोय, ही माहिती वस्तुस्थितीला धरून नाही. योग्य माहिती तुम्हाला दिली जाईल. सगळे आमदार आमच्यासोबत स्वेच्छेने आलेले आहेत. आमदारांच्या मालमत्तेचे तसेच जीविताचे रक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे, असेही शिंदे यांनी ठणकावले.
आरोप बिनबुडाचेकोणत्याही आमदारांकडील सुरक्षा काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहमंत्री म्हणून मी दिलेले नाहीत. त्यामुळे याबाबत करण्यात येत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे वळसे-पाटील यांनी ट्वीटद्वारे म्हटले.