नवी मुंबई : महापौरांसाठी पारसिक हिलवर बांधलेला बंगला वारंवार वादग्रस्त ठरू लागला आहे. तेथे कोण राहतात याची चौकशी करण्यात यावी. आगंतुक पाहुण्यांमुळे येथे घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने तत्काळ सीसीटीव्ही बसविण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे. महापालिकेचे जुने मुख्यालय, आयुक्त निवास, अग्निशमन केंद्र, गौरव म्हात्रे कला केंद्र, उपकर विभाग व महापौर बंगल्यातील हाऊसकिपिंगचे काम करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. पालिकेने २०११ मध्ये जय भवानी कन्स्ट्रक्शनला हा ठेका दिला होता. मुदत संपल्यानंतरही त्याला मुदतवाढ देवून काम करून घेतले जात आहे. सप्टेंबर २०१५ ते जून २०१६ दरम्यान केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ४४ लाख ७८ हजार रूपये खर्च झाला असून तो प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला. शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी महापौर वास्तव्य करत नसताना बंगल्याच्या देखभालीवर लाखो रूपये का खर्च केले जात आहेत, महापौर बंगल्यामध्ये कोण राहतो याची माहिती प्रशासनाने द्यावी अशी मागणी केली. यापूर्वी महापौरांना धमकीचे पत्र आले होते. त्यांच्या जीवितास धोका असल्यामुळे महापौर निवासस्थानाच्या चारही दिशांना सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी केली. सभापती शिवराम पाटील यांनीही या बंगल्याचा वापर कोणता आगंतुक पाहुणा करत आहे, असा प्रश्न उपस्थित केलाअतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी महापौर बंगला हा महापौरांचे निवासस्थान आहे. तेथील वास्तव्याची माहिती त्यांच्याकडूनच उपलब्ध होवू शकते. बंगल्याच्या बाहेर कॅमेरे बसविण्यासाठी त्यांनी मागणी केल्यास प्रशासनाकडून त्याविषयी कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. परंतु सभापतींनी आम्ही याविषयी यापूर्वीही पत्रव्यवहार केला आहे. महापौर बंगल्यात कोण येते, कोण जाते याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. यापूर्वी वंडर्स पार्कमधील स्वागत कक्षामध्येही बाहेरील व्यक्ती वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले होते. आता त्या ठिकाणी कोण राहात आहे. स्वागत कक्ष पालिकेच्या ताब्यात आहे का अशी विचारणा केली. सुरक्षेच्या कारणावरून शिवसेनेने प्रशासनाला कोंडीत पकडून सत्ताधारी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. महापौर बंगला बांधल्यापासून आतापर्यंत कोणत्या महापौरांनी कोणत्या काळात नियमित वापर केला. आतापर्यंत वर्षनिहाय झालेला खर्च व इतर सर्व तपशील मागविला जाणार असल्याने या विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. >उद्यान सर्वांसाठी खुले महापौर बंगल्याच्या बाहेर चार भूखंडांवर महापालिकेने उद्यान विकसित केले आहे. त्याविषयी जनहित याचिका दाखल झाली आहे. हे उद्यान नागरिकांसाठी कधी खुले करणार का, असा प्रश्न सभापती शिवराम पाटील यांनी उपस्थित केला.>वंडर्स पार्कची चावी प्रशासनाकडे नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये खासदार संजीव नाईक यांच्या निधीतून भव्य स्वागतकक्ष उभारला आहे. या कक्षाचा वापरही दुसरेच कोणीतरी करत होते. याविषयी सभापतींनी प्रशासनास माहिती विचारली. स्वागत कक्षाची चावी प्रशासनाकडे आहे का, तेथेही कॅमेरे बसवा अशी मागणी केली. यावर स्वागत कक्षाची चावी पालिकेच्याच ताब्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महापौर बंगल्याची सुरक्षा धोक्यात
By admin | Published: August 27, 2016 2:15 AM