लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत निवासी डॉक्टरांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांत रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमावेत या मागणीचा समावेश आहे. या मागणीची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने पोलिसांच्या मदतीने सर्व रुग्णालयांतील सुरक्षेचा आढावा घेऊन किती सुरक्षा रक्षकांची गरज आहे याची माहिती घेतली आहे. त्यानुसार पोलिसांच्या शिफारशीनुसार त्यांना सुरक्षा रक्षक दिले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी दिली आहे.
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात एका निवासी डॉक्टरची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करून कोलकाता येथील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्डनेही काम बंदची हाक दिली आहे. तसेच प्रशासनाकडे मागण्याचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवून पुरेशा सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, तसेच वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या, अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी या मागण्यांचा समावेश आहे.
शासकीय रुग्णालयाचा परिसर खूप मोठा असतो. त्यामुळे निवासी डॉक्टरांना अनेक वेळा एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी रुग्णसेवेसाठी जावे लागते. अशा वेळी डॉक्टरांना योग्य पद्धतीची सुरक्षा प्रदान केली जाणे गरजेचे आहे. काही वेळी डॉक्टर एकटे असल्याचे पाहून रुग्णांचे नातेवाईक किंवा समाजकंटक त्यांच्यावर हल्ला करतात. अशा घटना आता नवीन नाहीत. कोलकात्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी कोणत्या ठिकाणी किती सुरक्षारक्षक असावेत, किती सीसीटीव्ही असावेत आदी माहिती संबंधित रुग्णालय प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार नियोजन केले जाणार आहे. काही ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुरक्षारक्षक नेमले आहेत. गरज असेल, तेथे आणखी तैनात करण्यात येतील.- राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग