ठाणे : देशासाठी उत्तम समाज घडवायचा असेल तर मागास समाजाकरिता लागणारी रक्कम हा खर्च नसून ती एक मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूंची खरेदी करताना त्या दर्जेदार असतील, नियमाप्रमाणे असेल आणि पुरवठादारापेक्षा सामान्य माणसांना लाभदायक ठरेल अशाच प्रकारे खरेदी करावी आणि त्याच पद्धतीने गुंतवणूकही करावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला. आपल्याकडील विभाग हे इतर खात्यांसारखे खर्च करणारे नाहीत, अशी टिप्पणी मुंडे यांनी केली होती. त्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला.‘जागतिक आदिवासी दिना’च्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना विस्तारीकरण व टप्पा दोन’चा आरंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मागील १० ते १५ वर्षांत आदिवासी अथवा महिला व बालकल्याण विभागात जो कारभार सुरू होता, तो आता बदलला आहे. मंत्री बदलले असले तरी पुरवठादार मात्र तेच आहेत. परंतु त्या पुरवठादारांनी केलेल्या चुका आताच्या आदिवासी मंत्र्यांना सहन कराव्या लागतात. परंतु आता हे बदलले पाहिजे, आता साहित्याची खरेदी ही नियमानुसारच करताना ते साहित्य दर्जेदारच असावे, पुरवठादारासाठी नाही तर सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि या समाजातील नव्या पिढीसाठी उत्तम ठरावी, अशी गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आमचा विभाग हा इतर विभागांसारखा खर्च करणारा नसल्याचे भाष्य केले होते. त्याचा देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आपण करीत असलेला हा खर्च नसून ती देशातील नव्याने तयार होणाऱ्या भक्कम समाजासाठी केलेली गुंतवणूक आहे. त्यामुळे आपण खर्चापेक्षा गुंतवणूक किती करतो यावरच आपल्या देशाचे भवितव्य ठरणार आहे, असे फडणवीस म्हणाले.आदिवासींनी मागास राहता कामा नये, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर चांगल्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या समाजाने आधुनिकतेचा स्वीकार करावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. एकीकडे आम्ही आश्रमशाळा चांगल्या करणार आहोत तर दुसरीकडे आदिवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी २५ हजार मुलांना प्रवेश मिळवून दिला. यावर्षी त्यापेक्षा जास्त मुलांना आम्ही चांगल्या शाळांमधून शिकविणार आहोत. येत्या पाच वर्षांत दीड लाख विद्यार्थी या नामांकीत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेऊन एक उज्ज्वल समाज घडवतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २०१९ पर्यंत या समाजातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे म्हणूनही सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी महिलांमध्ये योग्य आहाराअभावी कुपोषण आढळते. त्यामुळे त्यांची मुलेही कमजोर होतात. शारीरिक वाढ बरोबर नसेल तर त्याचा परिणाम बौद्धिक वाढीवर होतोच. मध्यंतरी आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती सुधारत असून हेल्थ इंडिकेटर चांगले आले असल्याकडे त्यांनी फडणवीस यांनी लक्ष वेधले. मात्र त्यात अधिक सुधारणा करण्यासाठी आम्ही ‘अब्दुल कलाम अमृत आहार योजने’चा विस्तार केला असून आता अगदी बाळंत झाल्यावर ६ महिन्यांपर्यंत आम्ही मातेला पोषक आहार देणे सुरू केले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पुरवठादारापेक्षा सामान्यांचे हित बघा
By admin | Published: August 10, 2016 4:44 AM