पुणे: छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्यचा कारभार आपल्या हाती घेतला. त्यांच्यानंतर ताराबाई यांनी ही स्वराज्याची ज्योत पेटती ठेवली. महाराष्ट्रातील स्त्रिया कमी नाहीत हे दाखवून दिले. आपण आधुनिक काळात राहून इतिहासाचा विचार केला पाहिजे व भविष्याची तयारी केली पाहिजे, असे आवाहन शाहू छत्रपती महाराज यांनी केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर आणि छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती आयोजित ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, खासदार संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर अध्यक्ष श्रीपत शिंदे, छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, मुकुंद काकडे, मंजुश्री पवार उपस्थित होते.ताकवले म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज, संभाजीमहाराज, राजाराम महाराज यांनी स्वराज्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. तो संघर्ष समाजात अजूनही चालू आहे. कोणत्याही लढ्यासाठी नेतृत्वाची गरज असते. ती या तिन्ही छत्रपती महाराजांनी त्या काळात पूर्ण केली. पण आता हे नेतृत्व कोणालाच करता येत नाही.’’राणी ताराबार्इंनी वयाच्या पंचवीस वर्षांत औरंगजेबाशी लढा दिला. अशा राणीचे आपल्या तरुणींना नावही माहीत नाही. तीच माहिती कळण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात मी राजाराम महाराजांचा विचार करून इतिहास मांडला आहे.- जयसिंगराव पवार
इतिहास पाहून करा भविष्याची तयारी - छत्रपती शाहूमहाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 6:06 AM