पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा; अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:27 PM2019-09-28T16:27:39+5:302019-09-28T16:29:03+5:30
राजीनाम्यानंतर अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शिखर बँकेतील त्यांची भुमिका मांडली.
मुंबई : शिखर बँकेमध्ये शरद पवार संचालक नसताना, सदस्य किंवा त्यांची सहीही नसताना त्यांना मुद्दाम गोवण्यात आले. अजित पवार नाव नसते तर केस पुढेही आली नसती, असे सांगत अजित पवारांनी नुकत्याच बंदी आलेल्या पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा, असा इशारा दिला आहे.
राजीनाम्यानंतर अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शिखर बँकेतील त्यांची भुमिका मांडली. मी राज्य बँकेचा संचालक होतो. शरद पवार हे माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांचे नाव घेण्यात आले. राज्य बँकेने एखाद्या गिरणीला, कारखान्याला पैसे दिले ते त्यांनी कसे खर्च केले त्याची चौकशी केली तर मला काही आक्षेप नाही. अन्याय झाला तर न्यायपालिका आहेत. त्यांनी त्यांना हवा तो तपास करावा. मात्र, 2008 चे प्रकरण असताना आज निवडणुकीच्या काळात का गुन्हा दाखल केला. यामुळे शरद पवारांना या गोष्टीचा त्रास झाला, असेही त्यांनी सांगितले.
सहकारमध्ये काम करताना काय अडचणी असतात त्या 10 कोटी लोकांपैकी 1 कोटी लोकांनाच माहिती आहे. मात्र, माध्यमांमधून उरलेल्या 8-9 कोटी लोकांना वाटते भ्रष्टाचारच केला. आता यांना कुठे जाऊन सांगणार की 12 हजार कोटींच्या ठेवी असणारी बँकेत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार कसा होईल, असाही प्रश्न उपस्थित केला. तसेच माझ्यासह भाजपाचे अन्य नेतेही संचालक होते. नुकत्याच बंदी आलेल्या पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा, असेही अजित पवारांनी पत्रकारांना सांगितले.