जळगाव : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना यंदा शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे दिली.राज्यात १४.९९ लाख क्विंटल इतकी बियाण्यांची गरज आहे. १७.९० लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. बी.टी.कपाशी लागवडीसाठी १६० लाख पाकिटांची गरज असून त्यासाठी २०० लाख पाकिटे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पीक प्रात्यक्षिकासाठी ५४ हजार क्विंटल बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर एक लाख ५५ हजार क्विंटल बियाण्यांवर ३६ कोटींचे अनुदान देण्यात येईल. नवीन वाणांचे १.५० लाख क्विंटल बियाणे उत्पादन करण्यासाठी ३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तुरीची उत्पादकता वाढविण्यासाठी नव्या वाणाचे १,२०० क्ंिवटल बियाणे शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देणार आहोता. तेलबिया पिकाअंतर्गत २१,००० क्विंटल सोयाबीन बियाणे पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदानावर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.खरीप हंगामात रासायनिक खतांचा ३० ते ३२ लाख मेट्रीक टन वापर होतो. खरीपासाठी ४० लाख मेट्रीक रासायनिक खते उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत ११.८८ लाख मेट्रीक टन साठा शिल्लक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बियाणे, खते व किटकनाशके यासाठी ५७१ उत्पादक असून १.२४ लाख वितरक आहेत. गुणवत्ता नियंत्रणासाठी ३९५ भरारी पथकांची स्थापना केली आहे. केवळ कर्जदार नव्हे तर सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ दोन टक्के दराने विमा हप्ता भरायचा आहे. अति पाऊस, रोग व किडीपासून नुकसान, पुरामुळे शेती वाहून जाणे, जास्त तापमान यासह प्रथमच काढणीपश्चात नुकसानीसाठी पिकांना विमा संरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे मोफत
By admin | Published: May 16, 2016 2:22 AM