मुंबई - राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमून पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगाव- कवठे महांकाळमधून निवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी घोषणा केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वारे वाहू लागले आहे. इच्छुकांची उमेदवारीसाठी दावेबाजी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचा खुलासा रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी केला आहे.
तासगाव मतदारसंघ आबांचा बालेकिल्ला होता. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमून पाटील यांनी निवडणूक लढवत विजय सुद्धा मिळवला. तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून पुन्हा सुमून पाटील यांची उमेदवारी निश्चित समजले जाते. तर भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी तासगावमधून भाजपतर्फे तिकिटासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र आता आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी सुद्धा तासगावमधून निवडणूक लढण्यास तयार आहोत, अशी घोषणा केली आहे. महिला मेळाव्यात बोलताना, तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणू, अशी ग्वाही देखील सीमा आठवले यांनी दिली. मात्र ऐनवेळी कुणाच्या पदरात तासगावमधील भाजपची उमेदवारी पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.