मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास, या प्रकरणातील फरार आरोपी आणि सनातन संस्थेवर कारवाई करण्याबाबत केसरकर म्हणाले की, दोघा फरार आरोपींचा तपास सुरू आहे. तसेच सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव २०११ सालीच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. फरार आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. (प्रतिनिधी)दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आहे. यावर सरकारची काय भूमिका आहे, २०१४ साली हा तपास सीबीआयकडे दिला असताना खटला का चालत नाही, असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केले. शिवाय, आजकाल कोणालाही धमक्या येत आहेत, असेही गोऱ्हे म्हणाल्या. यावर उत्तर देताना, समाजात कोणाला धमक्या येत असतील, तर त्यांची नावे सांगितल्यावर संरक्षण देऊ तसेच सनातनचे संजीव पुनाळेकर यांची वैयक्तिकरीत्या चौकशी करता येईल की नाही, हे कायद्याच्या चौकटीतून पडताळून घ्यावे लागेल, असे केसरकर यांनी सांगितले.
फरार आरोपींची मालमत्ता जप्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 5:43 AM