मुंबई: एफडीएने सापळा रचून गुजरातूनहून अवैधपणे राज्यात आणला जाणारा ७२ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. गुजरात येथून अवैधपणे रस्ते मार्गाने सोमवारी गुटखा आणला जाणार असल्याची माहिती एफडीएच्या दक्षता विभागाला मिळाली होती. हा गुटखा रोखण्यासाठी एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आदेशावरुन कारवाई करण्यात आली. चारोटी नाका येथे गुटख्याच्या टेम्पोला थांबवून तपासणी करण्यात आली असता त्यात ७२ लाखांचा रुपयांचा गुटखा एफडीएच्या हाती लागला, अशी माहिती एफडीएचे सह आयुक्त दक्षता हरीष बैजल यांनी दिली. गुटख्याचा साठा एफडीएने जप्त केला असून वाहन चालक अश्फाक अहमद जमाल याला पालघरमधील डहाणू येथील कासा पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. चारोटी नाका म्हणजे हद्दीत आल्यावर गुटखा पकडण्यासाठी पालघरचे अप्पर अधीक्षक निलेश कोकाटे यांनीही मदत केल्याचे बैजल यांनी सांगितले. वाहन चालकाची अधिक चौकशी केल्यावर मीरा-भाईंदर येथे राहणाऱ्या राजन पांडे, शफी यांच्यासाठी काम करत असल्याचे त्याने स्पष्ट केले. यानंतर वाहन चालकासह संबंधित व्यक्तींवर कासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. (प्रतिनिधी)
गुजरातहून येणारा ७२ लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: February 17, 2016 3:12 AM