ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे 16 ते 18 जूनदरम्यान तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. दौ-यादरम्यान भाजपाचे मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्याचा आढावाही ते घेणार असून, भाजपाच्या नेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 200 जागा निवडून आणा, असा थेट आदेश अमित शाहांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच 2019च्या लोकसभा निवडणुकीत 48 जागा जिंकण्याचं टार्गेट पूर्ण करा, असंही म्हणाले आहेत. मुंबईतल्या कार्यकर्ता मेळाव्यात अमित शाह बोलत होते. उत्तर प्रदेशात 300 जागा येतील असं म्हटलं होतं. त्यावेळी आम्हाला हसण्यावर नेलं. आताही महाराष्ट्रात 200 जागा जिंकून आणा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. बुथ लेव्हलला पक्षाची बांधणी करा, ज्याला आव्हान पेलवणार नाही त्याने आताच सांगावं, अशा कानपिचक्याही जिल्हाध्यक्ष आणि आमदारांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजपा सरकारला धोका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. अमित शहांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर आमदारांनीही त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांची यादी तयार ठेवली आहे. अमित शहा कोणाला केव्हा काय विचारतील याचा नेम नाही. त्यामुळे कोणीही बेसावध राहू नका, असे पक्षाचे नेते बोलत आहेत. भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांशीदेखील शहा हे संवाद साधणार आहेत. आमदार, खासदारांप्रमाणे त्यांचेही रिपोर्ट कार्ड शहा घेणार आहेत.
पक्षाचे 19 विभाग आणि 10 प्रकल्प प्रमुख, विविध आघाड्यांचे प्रमुख यांना ते मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ संपादक, मराठी नाटक/सिने कलावंत, प्रबुद्ध नागरिकांशी शहा चर्चा करतील. पं.दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त भाजपाचे 15 हजार विस्तारक 90 हजार बुथमध्ये संपर्क करणार असून या उपक्रमाचा आढावाही शहा घेतील, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमित शहा जाणार ‘मातोश्री’वर
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की काय पण मित्रपक्ष शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न अमित शहा या दौऱ्यात करणार आहेत. ते रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाचे दर्शन शुक्रवारी घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांविरुद्ध सातत्याने टीका करीत असताना शहा हे कटूता कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.