बुलडाणा : यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. तुपकर यांच्या नियुक्तीला महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते चंद्रकांत दायमा यांनी आव्हान दिले होते. राज्य सरकारने तुपकर यांची १३ मे रोजी यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदावर निवड केली होती. या निवडीला आव्हान देत दायमा यांनी सदर निवड ही कायदेशिरबाबीचे पालन करुन झालेली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानुसार न्या. अभय ओक आणि रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने तुपकर यांची ही निवड रद्द केली आहे. या संदर्भात कायद्यातील तरतुदींनुसारच नवी निवड केली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने न्यायालयाला दिले असून, त्यानुसार महामंडळावरील अध्यक्षपदाची निवड नव्याने होणार असल्याचे संकेत आहेत. यासंदर्भात रवीकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने जर त्यांची निवड रद्द केली असेल तर न्यायालयाचा सन्मान राखून हे पद आपण त्वरित सोडून देवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
यंत्रमाग महामंडळावरील तुपकरांची निवड रद्द
By admin | Published: July 07, 2015 12:04 AM