मुंबई/अमरावती : राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजप-शिवसेनेत दंड-बैठका सुरू झाल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शक्यतो स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असा आदेश लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना दिला आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीत पश्चिम विदर्भातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आमदार, खासदांना मातोश्रीवर पाचारण करून निवडणुकीचा कानमंत्र दिला. दोन्ही प्रमुख नेत्यांनी लावलेला स्वबळाचा सूर पाहाता पालिका निवडणुकीत सेना-भाजप आमने-सामने लढण्याची दाट शक्यता आहे. आघाड्यांची भानगड नकोच नगरपालिका निवडणुकीत युती, आघाड्यांची भानगड ठेवू नका. अपवादात्मक स्थितीत फायदा असेल तरच युती करा. ते अधिकार स्थानिक नेत्यांना राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे भाजपा पदाधिकाऱ्यांना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)आमदारांना तंबी!२७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेली नगरपरिषदेची निवडणूक ही भाजपसाठी सन्मानाची लढाई आहे. भाजप आमदारांनी ही निवडणूक अंगावर घेऊन पहेलवानासारखे आखाड्यात उतरावे. ही स्थानिक स्तरावरील निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची नाराजी कशाला ओढवून घ्यायची असा विचार आमदारांनी करू नये, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली.यापूर्वी भाजपने कधीही पालिका निवडणुकीत रस घेतला नाही. नेत्यांचा सहभागही कमी राहायचा. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपा-शिवसेनेमध्ये स्वबळाच्या दंड-बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 4:57 AM