मुंबई : राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल.या योजनेत महाराष्ट्रातील रस्त्यावर झालेल्या अपघातांमधील व्यक्तींना याचा लाभ मिळेल. अपघातग्रस्त व्यक्ती कोणत्याही राज्याची किंवा परदेशतील असली तरी त्यांना उपचार देण्यात येतील. अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल. या योजनेत पहिल्या ७२ तासांसाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजारांपर्यंतचा खर्च केला जाईल. यात अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालय वास्तव्यातील भोजनाचा समावेश असेल. यात औद्योगिक, रेल्वे, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेल्या अपघाताचा समावेश नाही.- आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार जण मरण पावतात. वेळीच मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.
जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सवराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हा महोत्सव पाच दिवसांचा असेल कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास या वर्षात राबविण्यात येईल. अन्यथा पुढील वषापार्सून आत्मा नियामक मंडळाच्यामार्फत हे महोत्सव आयोजित केले जातील.
अंबडमध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयजालना जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापनेस व पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार १२ पदे पुनरुज्जीवीत करण्यात येत असून दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर या न्यायालयातून वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी एकूण १८ पदे बदलीने वर्ग करण्यात येतील.