भोर : ‘‘गुंजवणी-चापेट धरणातील पाण्याचा पुरेपूर फायदा आपल्याच भागाला मिळावा, या स्वार्थी भावनेतून काही जणांनी धरणाचे काम अनेक वर्षे रखडवले होते. मात्र, युती सरकारने धरणाचे काम हाती घेऊन टग्यांना चांगला धडा शिकवला आहे,’’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.भोरमधील तालुका शिवसेनेतर्फे शेतकरी मेळावा, शाखा उद्घाटन व धोमबलकवडी कालव्यात संपादित केलेल्या जमिनीचे धनादेश वाटप शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, सत्यवान उभे, दत्तात्रय टेमघरे, बाळासाहेब चांदेरे, केदार देशपांडे, युवराज जेधे, भालचंद्र मळेकर, रमेश कोंडे, किरण पवार, अमित शेवते, दीपक बर्डे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाप्रमुख माऊली शिंदे यांनी केले.धोमबलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने पाण्याची गळती होत आहे.पावसाळ्यात कालवा फुटून स्थानिक शेतकऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी वडतुंबी येथील शेतकरी बबन साळेकर यांनी केली. तर कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला कमी मिळाला असल्याची तक्रार चंद्रकांत चिकणे यांनी केली.धोमबलकवडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी वडतुंबी नेरे, धोंडवाडी, म्हाकोशी, टिटेघर, रावडी, बाजारवाडी, कर्नावड, धावडी गावांतील संपादित केलेल्या जमिनीचा ६ कोेटी १३ लाख ४५२ रुपये धनादेशाचे वाटप शेतकऱ्यांना शिवतारे व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. >गुंजवणीचे ६० टक्के पाणी बारामतीला, तर ४० टक्के पाणी माळशिरसला मिळावे म्हणून धरणाचे कामच आघाडी सरकारच्या काळात थांबवून तसे ठरावही करण्यात आले होते. मात्र, युती सरकार सत्तेवर आल्यावर तत्काळ धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, गुंजवणीचे पाणी पळविण्याचा डाव युती सरकार साकार होऊ देणार नाही. मात्र भोर, वेल्हे तालुक्याचे हक्काचे पाणी ठेवून राहिलेले पाणी पुरंदरला देण्यात येईल. युती शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला असून, सुमारे १८ टक्के पाणीसाठा झाला आहे. - विजय शिवतारे, जलसंपदामंत्री
स्वार्थी लोकांनी रखडवले गुंजवणी धरण
By admin | Published: September 21, 2016 2:05 AM