मुंबई : मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती करू नका, अशी आग्रही भूमिका घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. या स्वबळवाल्यांना आता त्यांचे स्वत:चे बळ सिद्ध करावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच मुंबईत युती व्हावी या भूमिकेचे होते. शिवसेनेला सत्तेत सोबत घेतलेले असताना निवडणुकीत युती तोडू नये, असे त्यांना वाटत होते. तथापि, मुंबईतील भाजपाच्या नेत्यांनी त्यांना स्वबळाचे साकडे घातले. त्यात वरील तीन नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते. त्यामुळे हे तिघे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करीत असलेले खा. किरीट सोमय्या हे प्रचारादरम्यान शिवसेनेच्या रडारवर असतील. या चौघांच्या मतदारसंघात भाजपाची कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. भाजपाच्या मुंबईतील नेत्यांनी स्वबळासाठी पक्षनेतृत्वाला जे तर्क दिले त्यानुसार, मुंबईत शिवसेनेला २०१२ वा त्याआधी सत्ता मिळाली त्यात भाजपाचे मोठे योगदान होते. या शहरात आमची ताकद किती आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसले. शिवसेनेपेक्षा आमचा एक आमदार जास्त निवडून आला. भाजपाची वाढती ताकद शिवसेना मान्यच करीत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ज्या भागांचा उल्लेख केला जातो ते दादर, लालबाग, परळ, वरळी, माहीम या भागात भाजपाला विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली. तसेच, या भागात उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारतींमध्ये आज भाजपाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली होती. युतीची बोलणी होत असतानाच्या काळात आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतानादेखील हा तर्क दिलेला होता. आता तो खरा करण्याची जबाबदारी शेलार यांच्यावर असेल. आपला परंपरागत मतदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता मतदार, हिंदी, गुजराती भाषिक मतदार यावर मुख्यत्वे भाजपाची मदार राहील. २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतबँकेला मनसेने मोठा सुरुंग लावला होता. दादरच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. गेल्या वेळेइतकी मते या वेळी मनसेला मिळणार नाहीत, असे म्हटले जाते. मनसेचा मतांचा घसरलेला टक्का शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. विशेषत: शिवसेना आणि मनसेत विभागली गेलेली मराठी मते शिवसेनेकडे वळली तर ती भाजपासाठी चिंतेची बाब असेल. (विशेष प्रतिनिधी)
स्वबळवाल्यांना सिद्ध करावे लागणार त्यांचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 3:18 AM