स्वत:च रचले सरण : कृषी समृद्धी महामार्गाला विरोधशिरपूर जैन : कृषी समृद्धी महामार्गाला विरोध म्हणून कृषी समृद्धी महामार्गात शेती जाणाऱ्या एका शेतकऱ्याने शुक्रवारी रस्त्यावर स्वत:च सरण रचून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित शेतकऱ्यांनी समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला. हा प्रकार केनवड गावालगतच्या रस्त्यावर घडला.केनवड परिसरातील शेकडो एकर जमीन मुंबई ते नागपूर या कृषी समृद्धी महामार्गात संपादित केली जाणार आहे. महामार्गासाठी जमिन जात असल्याने भूमिहीन होण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी केनवड येथील प्रभाकर शामराव बाजड नामक शेतकऱ्याने रस्त्यावरच स्वत:चे सरण रचून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित शेतकऱ्यांनी बाजड यांची समजूत काढून सरणावरून त्यांना खाली घेतले. यावेळी अन्य शेतकऱ्यांनीदेखील कृषी समृद्धी महामार्गासाठी एक गुंठाही जमिन न देण्याचा निर्धार केला.दरम्यान, यासंदर्भात शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांनी सांगितले की, या आत्मदहन आंदोलनाबाबत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना नव्हती. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याशी चर्चा करण्यात आली. संबंधित शेतकऱ्याने सांगितले की, महामार्गासाठी जमिन जाणार असल्याने नैराश्य आले आहे. या नैराश्यातून स्वत:च्या शेतालगतच्या रस्त्यावर आत्मदहनाचा निर्णय घेतला होता. मात्र, सहकारी शेतकऱ्यांनी समजूत काढल्याने आत्मदहन आंदोलन मागे घेतले, असे बाजड नामक शेतकऱ्याने सांगितले, अशी माहिती ठाणेदार गवळी यांनी दिली.
शेतकर्याचा आत्मदहणाचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 7:54 PM