पुणे : आदिवासी भागात ८ हजारहून अधिक औषधी वनस्पती असल्याची नोंद पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यांचे औषधी गुणधर्मही सांगितले आहेत. आता त्यावर सरकारने योग्य नियोजन करून त्या त्या आदिवासी भागात संशोधन केंद्र, वनस्पती जतनासाठी मार्गदर्शन, त्यांची बाजारपेठ तयार करणे आदींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यातून आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल आणि लोकवनस्पतींचे संवर्धन करता येईल. तसेच त्यामुळे समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे आदिवासी भागातील लोकवनस्पती विज्ञान (इथनो बायोलाँजी) हा प्रकल्प काही वर्षांपुर्वी घेतला होता. त्यात देशातील २० संस्थांचा सहभाग होता. देशातून आदिवासी क्षेत्रातून वनस्पतींची माहिती संकलित केली. १० हजारपेक्षा अधिक वनस्पतींची उपयोगिता समोर आली. त्यात ८ हजार वनस्पतींचे २५ हजार औषधी उपयोग नोंदविले गेले. ६ हजार नवीन उपयोग समोर आले. कारण आयुर्वेदात २ हजार वनस्पतींची माहिती आहे, अशी माहिती जेष्ठ वनस्पती तज्ज्ञ डाँ. विनया घाटे यांनी दिली.
सध्या आदिवासीमधील नवीन पिढी पोटापाण्यासाठी शहराकडे येत आहे. त्यांना त्यांच्या भागातच रोजगार उपलब्ध व्हायला हवा. स्थानिक पातळीवर कोणत्या वनस्पती येतात आणि त्यांचे उपयोग, त्याला बाजारपेठ कुठे ही साखळी तयार व्हायला हवी. सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन मार्गदर्शन करून रोजगार द्यायला हवा. ठिकठिकाणी वनस्पती संशोधन केंद्र उभी करून त्याची उपयोगिता सांगायला हवी. तरच हा अनेक वर्षांचा ठेवा जतन होईल आणि आदिवासींना देखील आत्मनिर्भर होता येईल, असे घाटे यांनी सांगितले. झ्र----------------वनस्पतींचे काही औषधी उपयोग मलेरियासाठी सिंकोना साल वापरतात. यातील क्विनाइनमुळे मलेरिया बरा होतो. अशक्तपणावर हळंद्याचे कंद, शक्तीपातावर निर्गुडीचा पाला, जनावर सुदृढ होण्यास रामन्था खायला देणे, कावीळ झाल्यावर अखरा हळंद्याचा कंद खायला देणे असे अनेक उपयोग आहेत. ----------------------फक्त संशोधन होऊन उपयोग नसतो. त्यावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अनेकजण संशोधन करतात. सरकारकडे प्रकल्प सादर होतात. पण त्यावर पुढे काहीच होत नसेल तर संशोधनाचा उपयोग कसा होणार ? - डाँ. विनया घाटे, जेष्ठ वनस्पतीतज्ज्ञ ---------------------आयुर्वेदासाठी औषधी वनस्पती लागतात. पण तसे आणून देणारे माहितीगार नाहीत. पुर्वी होते आता नाहीत. आदिवासी भागात सध्या रोजगार नाही. त्यांना वनस्पतींबाबत योग्य दिशा दिली, तर वनस्पती जतन होतील आणि त्यांना काम उपलब्ध होईल.
- डाँ. सुहास शितोळे, आयुर्वेद तज्ज्ञ