सावंतवाडी, दि. 3 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात कावळेसाद पाँईट येथे सोमवारी संध्याकाळी दोन तरुणांचा दरीत पडून मृत्यू झाला. सुरुवातीला सेल्फी काढण्याच्या नादात या तरुणांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. पण आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सेल्फीमुळे नव्हे तर, दारुपिऊन स्टंटबाजी करण्याच्या नादात या तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या दोघांवर दारुचा इतका अमल होता की, दोघांना स्वत:चा तोलही संभाळता येत नव्हता. या तरुणांची दरीला लागून असलेल्या कठडयावर स्टंटबाजी सुरु होती. एकदा कठडयावरुन खाली उतरल्यानंतर पुन्हा हे तरुण कठडयावर चढून खाली उतरले. दरीच्या टोकावर उभे असताना एकाचा पाय घसरला. त्यावेळी त्याने दुस-याचा हात पकडला होता. त्यामुळे दोघेही दरीत कोसळले.
यावेळी तिथे असणा-या लोकांनी आरडाओरडा करुन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण दोघेही काही समजण्याच्या अवस्थेत नव्हते. इमरान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावे आहेत. एक बीडचा तर, एक गडचिरोलीचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही शेतीकामे करायचे. दोघांची ओळख कशी झाली त्याची माहिती मिळू शकलेली नाही. ते सहलीसाठी तिथे आले असण्याची शक्यता आहे. पावसाळयात आंबोली घाटात दाट धुके असते. निर्सगाचे एक अनोखे रुप येथे पाहायला मिळते. त्यामुळे पावसाळयात मोठया संख्येने महाराष्ट्रातून पर्यटक इथे येत असतात.