लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूरमधील कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांपैकी काही अतिउत्साही पर्यटक कुंडात उंचावरून उड्या मारतात. त्यामुळे गेल्या वर्षी या कुंडात तब्बल आठहून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. कोंडेश्वरपाठोपाठ आता भोज धरणही पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहे. या धरणातही एका तरुणाचा सेल्फी काढत असताना तोल गेल्याने पाण्यात पडून मृत्यू झाला. या दोन्ही ठिकाणी सुरक्षेचे उपाय केलेले असतानाही पर्यटकांचा उत्साहीपणा आणि पाण्यासोबत केलेली मस्ती त्यांच्या जीवावर बेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी तारेचे कुंपण घातले. उंचावरून उड्या मारणाऱ्यांना अडथळा निर्माण केल्यावर मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. या वर्षीदेखील तशाच प्रकारची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोंडेश्वर धबधब्यावर अद्याप कोणताही मोठा अपघात झालेला नाही. मात्र, आता कोंडेश्वरजवळच असलेल्या भोज धरणाच्या पाण्याच्या पात्रात भिजण्याचा आनंद घेणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धरणातील जास्तीचे पाणी वाहून जाण्यासाठी जो बंधारा बांधला आहे, त्याची उंची सरासरी २० फूट आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे पाणी बाहेर पडते, त्या ठिकाणी खोल खड्डा झाला आहे. या खोल पाण्यात बंधाऱ्यावरून उड्या मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या तरुणांना पोहता येत नाही, त्यांच्यासाठी उड्या मारण्याचा खेळ जीवावर बेतणारा आहे.
सेल्फीच्या नादात तरुणाचा झाला मृत्यू
By admin | Published: July 17, 2017 1:10 AM