- सचिन राऊत, अकोलाशाळेतील हजेरी तपासण्यासाठी शिक्षकांना सेल्फी काढून ती केंद्रप्रमुखासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या व्हॉटस्-अॅप ग्रुपवर पाठविण्याचा अजब प्रकार अकोला जिल्ह्यात गत काही दिवसांपासून सुरू आहे. तथापि, या प्रकाराने जिल्ह्यातील शिक्षिका कमालीच्या वैतागल्या आहेत. त्यांच्या सेल्फींचा दुरूपयोग होण्याची भीती व्यक्त होत आहे.शिक्षकांनी शाळेत सकाळी १० वाजून २५ मिनिटांपूर्वी पोहोचले पाहिजे, असा नियम आहे. काही शाळांमध्ये हजेरी रजिस्टर, तर काही शाळांमध्ये बायोमेट्रीक मशीन लावण्यात आल्या असून, त्याचे कनेक्शन मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या संगणकाला जोडण्यात आले आहे. तरीही शिक्षकांची हजेरी तपासण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांना ‘सेल्फी’ पाठविण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार शिक्षकांना ‘रोज सेल्फी काढणे, ती केंद्र प्रमुखांच्या व्हॉटस-अॅपवर पाठविणे’ असा हा नित्यक्रम सुरू आहे.या सेल्फी केंद्रप्रमूख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षण विभागाच्या काही व्हॉटस अॅप ग्रुपवरही पाठवाव्या लागतात.शिक्षिकांना हा प्रकार ओंगळवाणा वाटत आहे. रोज सेल्फी काढून ती एवढ्या लोकापर्यंत पाठविणे म्हणजे एक प्रकारे चारित्र्याचे हननच आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच या प्रकाराला शिक्षिकांनी विरोध सुरू केला आहे. शिक्षिकांच्या सेल्फीचा दुरुपयोग झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.असा घ्यावा लागतो ‘सेल्फी’शाळेमध्ये पोहोचल्यानंतर शिक्षिकेला मुख्याध्यापकाचे कार्यालय किंवा त्यांच्या कार्यालयातील घड्याळासमोर उभे राहून सेल्फी घ्यावी लागते. त्यानंतर हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करतानाची सेल्फी घ्यावी लागते. १० वाजून २५ मिनिटांपूर्वी शाळेत पोहोचल्याचे स्पष्ट करणाऱ्या या सेल्फी केंद्रप्रमुखांमार्फत वरिष्ठांकडे पाठविण्यात येतात.उर्दूच्या शिक्षिका बुरखा घालून शाळेत येत असल्याने, त्यांना हजेरीपटाचे छायाचित्र व्हॉट्स अॅपवर पाठवावे लागते.‘चल मॅडम, सेल्फी दे दे रे...’शिक्षण विभागाने जिल्हा स्तरावर, पंचायत समिती आणि केंद्र स्तरावर व्हॉट्स अॅपचे वेगवेगळे ग्रुप्स बनविले आहेत. या ग्रुप्सवर शाळा उघडण्यापूर्वीच ‘चल मॅडम, सेल्फी दे दे रे...’ अशा प्रकारचे मॅसेजेस पाठविण्यात येतात.शिक्षिकांसाठी ही डोकेदुखी असून, त्यामुळे शिक्षण विभागाने सेल्फीच्या सक्तीचा फतवा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. शाळांचे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ‘माझी शाळा’ नावाने हे ग्रुप असून, यावर शिक्षकांची हजेरी तपासण्यासाठी सेल्फी मागविण्यात येतात. यासोबतच काही इतर उपक्रमांची छायाचित्रेही या ग्रुपच्या माध्यमातून गोळा करण्यात येतात. शिक्षक वेळेवर शाळेत येतात की नाही, यासाठी सर्वच शिक्षकांना सेल्फी काढून ती केंद्रप्रमुखांना पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे.- अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, अकोला
शिक्षकांची हजेरी तपासण्यासाठी ‘सेल्फी’ची सक्ती!
By admin | Published: February 28, 2016 1:23 AM