शेगाव (बुलडाणा) : वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीला पाणी देणे शक्य नसताना, विहिरीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यास बँकेने सुरुवात केल्याने, हताश झालेल्या शेतकऱ्याने कर्जमुक्तीसाठी स्वत:चे अवयवच विक्रीस काढले आहेत.शेगाव तालुक्यातील दिलीप भाऊराव देशमुख यांनी बँकेकडून कर्ज घेऊन शेतात विहीर खोदली. विहिरीला पाणीही भरपूर आहे. बागायत करणे शक्य होणार असल्याने दिवस पालटतील, अशी आशा त्यांना होती. मात्र, आठ महिन्यांपासून ते वीज कनेक्शनसाठी कार्यालयात चकरा मारत आहेत. शेगाव तालुक्यातील वरखेड खु. येथे देशमुख यांची शेती आहे. शेतातील ढासळलेली विहीर नव्याने बांधण्यासाठी त्यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यासाठी कुठलीच योजना नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पाच लाख रुपये खर्च करून विहीर उभारण्याचे प्रयत्न केले. पैसा कमी पडल्याने त्यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शेगाव शाखेतून सहा महिन्यांपूर्वी शेत गहाण ठेवून दोन लाख रुपये कर्ज घेतले व विहीर तयार केली. सुदैवाने त्यांच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. ‘४० दिवसांत शेतकऱ्यांना वीज कनेक्शन’ ही शासनाची घोषणा असताना आठ महिन्यांपासून ते महावितरणच्या शेगाव कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र, त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. रब्बीचा हंगामही निघून जाईल, अशी त्यांना भीती आहे. (प्रतिनिधी)
कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याने काढले अवयव विक्रीला
By admin | Published: November 08, 2015 12:27 AM