लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चोरीच्या मोटारसायकलनंतर हिसकावून पळविण्यात येणारे मोबाइल ‘ओएलएक्स’वर विकले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी गुरुवारी ‘मोबाइल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या आहेत. नौशाद मन्सुरी, अकबर खान, रईस सय्यद आणि इम्रान शेख अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघे माहीम, धारावी परिसरातील रहिवासी आहेत. बीकेसी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, यातील सय्यद आणि शेख हे महिला आणि वृद्धांचे मोबाइल तसेच बॅग हिसकावण्याचे काम करतात. हे चोरलेले मोबाइल आणून ते मन्सुरीला विकायचे. मन्सुरी हे मोबाइल या चोरांकडून विकत घ्यायचा आणि ते खानला द्यायचा. खान या मोबाइलची बोगस बिले तयार करून त्याचा फोटो ‘ओएलएक्स’वर टाकायचा. जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. त्यानंतर मोबाइलसाठी एखादा ग्राहक सापडला की ही बनावट बिले ‘ओएलएक्स’कडे देऊन हे दोघे त्याची विक्री करायचे. या विकलेल्या मोबाइलचे आलेले पैसे दोघे वाटून घ्यायचे. यातील मन्सुरी आणि खान हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर सय्यद आणि इम्रान यांची चौकशी सध्या पोलीस करत आहेत.‘तो’ नंबर ट्रेस झाला आणि...गेल्या अनेक महिन्यांपासून मन्सुरी आणि खान हे रॅकेट चालवत होते. मात्र ३० मे, २०१७ला बीकेसी परिसरात रात्री रिक्षात बसलेल्या एका महिलेची बॅग सय्यद आणि शेखने हिसकावली आणि पळ काढला. या घटनेची तक्रार तिने बीकेसी पोलिसात केली. त्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाइल ट्रेस केला. या मोबाइलची विक्री ज्या ग्राहकाला केली होती, त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा तो मोबाइल ‘ओएलएक्स’वरून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार ‘ओएलएक्स’च्या संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीत खानचे नाव पुढे आले. त्यांच्याकडून मन्सुरीबाबत पोलिसांना समजले. त्याने दिलेल्या माहितीचा वापर करत पोलीस उर्वरित दोन आरोपींपर्यंत पोहोचले.
चोरीच्या मोबाइलची ‘ओएलएक्स’वर विक्री
By admin | Published: June 09, 2017 2:10 AM