मुंबई : मुंबईत सर्वाधिक जागा निवडून आल्या तरी शिवसेना आणि भाजपाला जादुई आकडा गाठता आलेला नाही़ निवडून आलेल्या बंडखोरांपैकी एक व तीन अपक्ष असे चार जण गळाला लागूनही शिवसेनेला बहुमतासाठी २६ जागा कमी पडत आहेत़ त्यामुळे पुन्हा भाजपाचीच साथ घ्यायची की अन्य पर्याय शोधायचा, याची चाचपणी वरिष्ठ पातळीवर शिवसेनेत सुरू झाली आहे़ महापौरपदासाठी आतुर भाजपातही भेटीगाठी व खलबते सुरू आहेत़ त्यामुळे निवडणुकोत्तर चर्चांचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले आहे. अटीतटीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकून पहिला नंबर पटकावला. परंतु अन्य पक्षांशी, अपक्षांशी हातमिळवणी केल्याशिवाय शिवसेनेला महापालिकेवर पुन्हा भगवा फडकविता येणार नाही़ अशावेळी भाजपा हाच पर्याय ठेवावा का, यावर शिवसेनेत उलटसुलट चर्चा सुरू आहे. जादुई आकडा गाठू शकलेली नसली, तरी भाजपाची मुंबईत वाढलेली ताकद शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे़
महापौरपदासाठी भाजपानेही जमवाजमव सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर खलबते सुरू आहेत़ बरोबरीत असलेल्या उभय पक्षांमध्ये युतीचा फायदा व नुकसान चाचपून मगच त्यावर अंतिम फैसला होण्याचे संकेत आहेत़ चार अपक्ष शिवसेनेच्या गोटात भाजपापेक्षा केवळ दोन जागा अधिक मिळवणाऱ्या शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे़ त्यामुळे एकीकडे युतीबाबत विचार होत असताना दुसरीकडे अपक्ष व विजयी बंडखोरांनाही जवळ केले जात आहे़ त्यामुळे मुंबई महापालिकेचा निकाल लागून २४ तास उलटण्याआधी शिवसेनेच्या गळाला चार नगरसेवक लागले आहेत़ यामध्ये दोन शिवसेनेचे बंडखोर असून दोन अपक्ष आहेत़ एकत्र येणे हाच पर्याय -गडकरी मुंबईत भाजप-शिवसेनेने झालं गेलं विसरून एकत्र येण्यावाचून सध्या तरी पर्याय नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी मुंबईतील युतीबाबत सुतोवाच केले. शिवसेनेसोबत भाजपाची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे. दोघांत वैचारिक मतभेत नाहीत. निवडणुकीत मतभेद असले तरी ते टोकाचे नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अडीच वर्षे वाटून घ्या - आठवलेमहापालिकेत सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना-भाजपाने एकत्र येऊन अडीच अडीच वर्षे महापौरपद वाटून घ्यावे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबईत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झालेला आहे. शिवसेनेने काँग्रेसचे समर्थन घेऊ नये, असे म्हणत दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन पहिला महापौर कुणाचा? हे ठरवावे असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात युती तोडा मग पाहू -चव्हाणशिवसेनेची भाजपाबरोबर असलेली राज्यातील युती तुटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा विचार करता येईल, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. ‘सध्या तरी पालिकेत बहुमत मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपा काय भूमिका घेतात, याकडे आमचे लक्ष आहे,’ असे ते म्हणाले.मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या अन्य पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने तातडीची बैठक घेतली. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर चव्हाण यांनी प्रसार माध्यमांसमोर हे वक्तव्य केले. ‘आमची भूमिका सध्या तरी ‘वेट अॅण्ड वॉच’ची आहे. शिवसेना आणि भाजपाचे राज्यात एकत्र सरकार आहे. त्यामुळे आधी त्यांनी निर्णय घ्यायचाय की त्यांना एकत्र राहायचे आहे की नाही. आम्ही तर तिसरा पक्ष आहोत. त्यामुळे आता काहीही सांगणे योग्य नाही,’ असे अशोक चव्हाण म्हणाले‘कोणत्याही स्थितीत मुंबईच्या महापौरपदावरील दावा सोडता कामा नये, मुंबईत भाजपाचाच महापौर विराजमान झाला पाहिजे,’ अशा स्पष्ट सूचना करणारा फोन भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वाला केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले. त्यामुळे मुंबईतील सत्तेची समीकरणे अधिक गडद झाली. उद्धव ठाकरे आज करणार चर्चाभाजपाशी पुन्हा युती करायची वा नाही, हे ठरविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये सर्व नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक उद्या, शनिवारी दुपारी ४ वाजता बोलाविली आहे. त्यांना काय व्हावे असे वाटते? ते उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. बैठक झाल्यानंतरही निर्णय लगेचच जाहीर केला जाण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.आधी युती तोडा, मग पाहू - चव्हाणसेनेची भाजपाबरोबर असलेली राज्यातील युती तुटल्यानंतर मुंबई महापालिकेत सेनेला पाठिंबा देण्याबाबतचा विचार करता येईल, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.