महेश चेमटे मुंबई : एसटी महामंडळाच्या धक्कादायक निर्णयामुळे प्रवाशांना फटका बसणार आहे. एसटी महामंडळाने हिरकणी व रातराणी एसटीच्या जागी शिवशाही चालवण्यात याव्या, अशा सूचना परिपत्रकातून दिल्या आहेत. यामुळे भविष्यात एसटी महामंडळात साधी आणि शिवशाही हे दोनच पर्याय उपलब्ध राहतील. सेमी लक्झरीच्या तुलनेत ‘शिवशाही’चे तिकीट महाग असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी बसकडे जाण्याची शक्यता आहे.‘राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होणार आहेत. या शिवशाही सध्या चालू असलेल्या हिरकणी व रातराणीऐवजी चालवण्यात याव्यात. यामुळे हिरकणी एसटीच्या फेºया शिवशाही बसमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत’, असे साध्या व रातराणी सेवेचे श्रेणी उन्नतीकरण या विषयाखाली काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. हे परिपत्रक राज्यभरात पाठवण्यात आले. सद्य:स्थितीत ४३१ शिवशाही धावत असून यापैकी ३२४ स्वमालकीच्या आणि १०७ भाडेतत्त्वावरील आहेत. एसटी महामंडळ दोन हजार शिवशाही बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करणार आहे. यापैकी १ हजार ५०० भाडेतत्त्वावर व ५०० बस स्वमालकीच्या असतील. यात शयनयान शिवशाहीचादेखील समावेश आहे.‘उन्नतीकरण’ या नावाखाली एसटीमधील सेमी लक्झरी बंद करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना साधी आणि लक्झरी शिवशाही असे दोनच पर्याय उपलब्ध होतील.परिणामी यामुळे एसटीचा प्रवासीवर्ग हा खासगी सेमी लक्झरी बसकडे जाईल. यामुळे महामंडळ डबघाईला येण्याची भीती महामंडळातील वरिष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या विरोधात मतप्रदर्शन केल्यामुळे एसटी कर्मचाºयावर कारवाई करण्यात आली होती. यामुळे सध्या महामंडळातील एकही कर्मचारी व अधिकारी बोलण्यास धजावत नाही.सेमी लक्झरीच्या जागी शिवशाही आल्यास...मुळात हिरकणी आणि रातराणी या ‘सेमी लक्झरी’ प्रकारातील बस आहेत, त्या जागी थेट ‘लक्झरी’ शिवशाही आल्याने साहजिकच भाडेवाढ होईल.भाडे परवडत नसल्याने प्रवासी खासगी बसकडे वळेल.यामुळे एसटी बस बंद होऊन खासगी बस सुरू झाल्याचे उदाहरण कोकणात संगमेश्वर आणि दापोली येथे असल्याचे अधिकारी सांगतात.
‘शिवशाही’साठी ‘सेमी लक्झरी’ बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:33 AM