ऑनलाइन लोकमत /आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. 20 - सामनातून भाजपावर टीका करणं ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. देशांत-राज्यात सत्तेत असताना मांडीला मांडी लावणारे पक्ष मात्र मुखपत्रातून टीका करतात. जमत नसेल तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. 'मोदी महात्मा कधी झाले, चरखासोबत फोटो काढून प्रसिद्ध करणे कशासाठी, अस सवाल करत त्यांनी मोदींवर टीका केली.
शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांच्यात चर्चा व विचारविनिमय सुरू आहे. काही जिल्ह्यातील तालुकास्तरावरील परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला आघाडी करणे जमणार नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी समन्वय साधून स्थानिक परिस्थितीनुसार सन्मानपूर्वक जागा वाटपानंतर आघाडी करावी. यामुळे अजित पवारांचा काँग्रेसबरोबर आघाडीबाबत सावध पवित्रा दिसून येत आहे.
भाजपाने नोटाबंदीचा निर्णय घेतला मात्र तो आता फसल्याचे दिसून येत असताना नोटाबाबत बोलण्याऐवजी सरकार कॅशलेसबाबत बोलत आहे. नोटाबंदीनंतर देशात घोटाळे वाढलेले आहेत. राज्यातील प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे़ त्यामुळे आघाडीत वेगवेगळे निर्णय होतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आघाडी करताना समन्वयाची भूमिका घेऊ, असेही ते म्हणाले. शिवाय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माझ्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही, राष्ट्रवादी पक्ष उभारणीत मोहिते-पाटील यांची प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी निवडणुक प्रक्रियेत उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज ही पद्धत फार चुकीचीही असल्याचेही अजित पवार म्हणाले.