नागपूर : नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळच्या बैठकीत काहीच बोलत नाहीत. प्रकल्पाची त्यांना माहिती नाही. सेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बिस्कीट खायला जातात का, असा सवाल करीत उद्योग मंत्र्यांना मंत्रिमंडळात काहीच किंमत नसल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.गेल्या आठवड्याभरापासून नाणार प्रकल्पाचा मुद्दा गाजत आहे. सत्ताधारी भाजप या प्रकल्पासाठी आग्रही असून शिवसेनेसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी याला विरोध करीत आहे. या प्रकल्पावरून सातत्याने सभागृहाचे कामकाजही ठप्प पाडले जात आहे. सत्तेत असूनही शिवसेनेला आंदोलन करावे लागत आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका केली जात आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी भाजप आणि शिवसेना दोघांवरही सडकून टीका केली. नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले निवेदन असमाधानकारक व दिशाभूल करणारे होते. नाणार प्रकल्पावर समन्वय आणि संवादाने मार्ग काढला जाईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मात्र दुसरीकडे केंद्राच्या पातळीवर प्रकल्प पुढे नेण्यासंदर्भात करारही केले जातात.विखे पाटील यांनी शिवसेनेच्या दुतोंडी भूमिकेचाही चांगलाच समाचार घेतला. नाणार प्रकल्प रद्द करावा म्हणून शिवसेनेचे आमदार विधानसभेत गोंधळ करत असताना शिवसेनेचे मंत्री शासकीय कामकाजात सहभागी होतात. नाणार प्रकल्पाची भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याच्या प्रस्तावावर सही केली असून, मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी फाईल पाठविल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई सांगतात. उद्योग मंत्र्यांच्या सहीला काहीच किंमत राहिलेली नाही का, असा सवालही त्यांनी केला.शिवसेनेने आपली मर्दानगी दाखवावीनीतेश राणे यांनी सुद्धा नाणारवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे सांगत एकीकडे विरोध दुसरीकडे कामकाजात सहभाग असे का? गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेची नौटंकी आम्ही बघतो आहे. शिवसेनेला नाणार नकोच असेल तर सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होण्याची मर्दानगी दाखवावी, असा टोला त्यांनी लावला.सेनेची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावीनाणारवरून मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेनेची भूमिका मांडताना सुनील प्रभू म्हणाले की, स्थानिकांच्या विरोधात हा प्रकल्प लादला जाणार नाही. त्यामुळे त्यांनी ३१/१ ची अधिग्रहणाची नोटीस रद्द करावी. आम्ही मुख्यमंत्र्यांना गावकऱ्यांनी ग्रामसभेतून विरोधात केलेला प्रस्ताव सादर केला आहे. उद्योगमंत्र्यांनी अधिग्रहण रद्द करण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडे पाठविली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची भूमिका लक्षात घेता, अधिग्रहणाची फाईल मंजूर करावी.
सेनेच्या मंत्र्यांना काहीच किंमत नाही - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:42 AM