नाशिक : जलयुक्त शिवारची कामे समाधानकारक नाहीत, वीज कंपनीच्या कारभारावर तर बोलायलाच नको, सार्वजनिक वितरण व्यवस्था दुरुस्त करा, कृषी खात्याची कामेच दिसत नाहीत, आदिवासी विकास खात्याच्या आश्रमशाळा तपासा अशा विविध टिप्पण्या करीत शिवसेनेच्या दुष्काळी आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी भाजपाकडे असलेल्या खात्यांबाबत नाराजी व्यक्त केली. यंत्रणा कामे करीत नसल्यामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, असे खापरही त्यांनी अधिकाऱ्यांवर फोडले.प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आलेले शिवसेनेचे आमदार व विविध खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रत्येक आमदारांनी वस्तुस्थिती मांडत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण मागितले.आदिवासी खात्यावर सरकार प्रचंड पैसा खर्च करीत असूनही आश्रमशाळांची अवस्था अतिशय बिकट असून, विद्यार्थ्यांना नकली वस्तू पुरविल्या जात आहेत. त्यामुळे सर्वच आश्रमशाळांची तपासणी करून त्यांचा कारभार दुरुस्त करा, अशी सूचना यावेळी करण्यात आली. वाढीव बिले, वीज जोडणीस व रोहित्र दुरुस्तीस लागणारा विलंब, ठेकेदारावर करण्यात येणारी मेहरनजर पाहता वीज कंपनीचा कारभार अतिशय गंभीर असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.मागणीच्या तुलनेत जलयुक्त शिवार योजनेच्या कामे कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. कृषी खात्याच्या अनेक योजना असतानाही त्यांचे अस्तित्वच कोठे दिसत नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात तरी कामे करा, असा सल्लाही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आला.
भाजपाकडील खात्याच्या कारभारावर सेनेची नाराजी
By admin | Published: December 20, 2015 12:15 AM