ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 05 - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदीचा मुद्दा लवकर न सुटल्यास आपण संसदेत निदर्शने करू, असा इशारा शिवसेनेच्या लोकसभेतील सदस्यांनी बुधवारी दिला.
एअर इंडियाच्या एका अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी इअर इंडियासर सर्व विमान कंपन्यांनी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे.या प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेत उमटले असून, गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी लावून धरली आहे.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन सभागृहाच्या रक्षक आहेत. मात्र, आमचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही, असे शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले. हा मुद्दा न सुटल्यास आम्हाला निदर्शने करावी लागतील. सरकारचा घटक असल्यामुळे आम्ही सभागृहात गोंधळ करू इच्छित नाही; परंतु आम्हाला तसे करणे भाग पडेल. हवाई प्रवास हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शून्य प्रहरात भाजपचे देवजी मानसिंगराम पटेल यांनीही विमान कंपन्या मनमानी करीत असल्याचा आरोप केला.