मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून गेले आठ दिवस सभागृहातील प्रचंड गदारोळात सामील झालेल्या शिवसेनेच्या आमदारांनी आज वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अर्थसंकल्पाचे भाषण निमूटपणे बसून ऐकले. शिवसेनेने असा अचानक ‘यू टर्न’ घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आधी निवेदन मगच अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटलींशी केलेली चर्चा आणि त्या अनुषंगाने शेतकरी कर्जमाफीविषयी सभागृहात आधी निवेदन केले तरच अर्थसंकल्प मांडण्यास सहकार्य करू, अशी अट शिवसेनेने टाकली होती. ती मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी केली आणि सहकार्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री निवेदन करणार असतील तर अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घालू नका, असा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेशवजा निरोप होता, असे शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन सभागृहात केले त्यामुळे शासनाची भूमिका कर्जमाफीच्याच बाजूची असल्याचे स्पष्ट होते. आजच्या अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असेल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मांडताना गोंधळ न घालण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असे शिवसेनेचे आ.अनिल कदम आणि सुनील प्रभू यांनी विधानभवनात पत्रकारांना सांगितले. विरोधकांचा गदारोळविधानसभेचे कामकाज सकाळी ११ ला सुरू होताच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गदारोळाला सुरुवात केली. घोषणा अन् गोंधळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज दुपारी १२ पर्यंत आणि मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर दुपारी २ पर्यंत तहकूब केले.
सेनेचा ‘यू टर्न’; विरोधकांचा गदारोळ
By admin | Published: March 19, 2017 1:44 AM