मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या दहा मंत्र्यांपैकी काहींचा खांदेपालट करण्यासाठी आमदारांमधून दबाव वाढत असून उद्धव ठाकरे यांनी आमदारांची मते जाणून घेण्यासाठी ६ एप्रिल रोजी बैठक आयोजित केल्याचे समजते.जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत खदखद वाढली असून सेनेच्या मंत्र्यांविषयी पक्षात कमालीचा रोष असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. निवडणुकीत मंत्री फिरकलेच नाहीत. शिवाय, आपलेच मंत्री कामे करीत नाहीत, अशा तक्रारींचा पाढा आमदारांनी पक्षप्रमुखांपुढे वाचला होता. त्यानंतर ठाकरे यांनी मंत्र्यांची बैठक घेऊन आमदारांच्या तक्रारी येऊ देऊ नका, अशी समज दिली होती. पक्षप्रमुखांनी समज देऊनही काहीही फरक न पडल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. त्यामुळे मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत ‘थोडं थांबा’ असा सबुरीचा सल्ला दिला होता. त्यामुळे काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो असे मानले जात आहे. शिवसेनेचे पाच कॅबिनेट तर पाच राज्यमंत्री आहेत. त्यातील विधान परिषदेचे सदस्य असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांना हटवून विधानसभेच्या सदस्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ.दीपक सावंत हे विधान परिषदेचे सदस्य शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत. ठाण्याचे एकनाथ शिंदे हे एकमेव विधानसभा सदस्य कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेनेच्या पाचपैकी तीन कॅबिनेट मंत्र्यांना बदलले जाऊ शकते. एक किंवा दोन राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री केले जाईल आणि एखाद्या विधानसभा सदस्याला थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. दोन जणांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागेल. आता ६ एप्रिलला ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदारांची बैठक पुन्हा बोलविली आहे. त्या बैठकीत काय होते या बाबत उत्सुकता आहे. (विशेष प्रतिनिधी) >मंत्रिपदासाठी इच्छुक!गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदासाठी मी इच्छुक आहे. सध्या शिवसेनेच्या मंत्रिपदांत खांदेपालट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यावेळी पक्षप्रमुख कोल्हापूरबाबत सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे, असे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी कोल्हापूर येथे सांगितले.
सेनेत खदखद!
By admin | Published: April 04, 2017 6:22 AM