Maharashtra Politics: हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) अडचणीत सापडल्या आहेत. सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. याशिवाय संतांच्या बाबतीत केलेल्या विधानासंदर्भात सुषमा अंधारे यांच्याविरोधात राज्यभर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता संत आणि संत साहित्याचा अपमान करण्यासाठी सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणलेय, अशी टीका करण्यात आली आहे.
संतांनी रेड्याला शिकवले. पण माणसांना कुठे शिकवले?, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले असल्याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. याशिवाय सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे. यानंतर आता ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी संत साहित्यावर सुषमा अंधारे यांनी केलेल्या विधानावरून टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी
संत आणि संत साहित्याचा अपमान करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना शिवसेनेत आणले, असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला. तसेच यासाठी उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात नाक घासून माफी मागावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. दुसरीकडे, विश्व वारकरी संघाकडूनही संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांचे विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी विश्व वारकरी संघाने सुरु केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी जाहीर केले आहे. वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"