Tahawwur Rana Extradition To India: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर आता राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आहेत. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. आताच्या घडीला राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केली. राणाला एनआयए मुख्यालयात नेले जात असून, तिथे त्याची चौकशी केली जाईल. याबाबत २६/११ प्रकरणाचा खटला लढलेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
चांगली गोष्ट आहे, भारताचे मोठे यश आहे
तहव्वूर राणा याला भारतात आणले गेले आहे, याबाबत पत्रकारांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. भारताचे मोठे यश आहे. ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्याविरुद्ध कोणता खटला दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता याबद्दल बोलणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबद्दल बोलेन, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तहव्वूर राणा हा पाकिस्तानी लष्कर/आयएसआयचा सदस्य आहे. त्याचा २६/११ हल्ल्याच्या कटात थेट सहभाग बोता. राणाच्या प्रत्यार्पणाबाबत पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानने तहव्वूर राणापासून स्वतःला दूर केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, तहव्वूर राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे त्याचे कॅनेडियन नागरिकत्व अगदी स्पष्ट आहे.