नाशिक : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना देण्यात येणारे मानधन थेट बँक खात्यात जमा व्हावे, यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या भूमिकेला ज्येष्ठ कलावंतांनीच खो दिला असून, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे तर दूरच; परंतु अनेक तालुक्यांतून त्यांची माहितीच मिळत नसल्याने मानधनाची ‘आॅनलाइन ट्रान्सफर सिस्टीम’ अद्याप कागदावरच आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होणाऱ्या मानधनाबाबत कलावंतांना आधी जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी लागते. मग तेथून मिळालेला धनादेश ट्रेझरी कार्यालयातून वटवावा लागतो. त्यासाठी मग वेळप्रसंगी ज्येष्ठ कलावंतांना बँकेत तिष्ठत बसावे लागते. त्यामुळे ज्येष्ठांना आधार मिळावा यासाठी राज्य शासनाने आॅनलाइन मानधन जमा करण्याची योजना सुरू करण्याचे ठरविले. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत त्याचा प्रचार करून कलावंतांना आवाहन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात ६०४ ज्येष्ठ कलावंत आहेत. त्या कलावंतांनी नॅशनलाईज् बँकेत खाते उघडावे, जनधन योजनेनुसार त्यात झीरो बॅलन्सने खाते उघडता येते, यासाठी ग्रामीण भागातही माहिती देण्यात आली; परंतु त्याला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही.समाजकल्याण विभागातर्फे ज्येष्ठ कलावंतांची माहिती गोळा करीत आहोत. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडल्यानंतर प्रत्येक कलावंताचे मानधन ठरावीक काळात त्याच्या खात्यात जमा होईल आणि ते त्याला लगेच काढताही येईल, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिंदे यांनी सांगितले.राज्यातील हजारो ज्येष्ठ कलावंतांना या योजनेचा लाभ होणार आहे. सध्या राज्य शासनातर्फे अ, ब आणि क असे तीन गटांद्वारे मानधन दिले जाते. गटांनुसार मानधनाची रक्कम वेगवेगळी आहे. ‘अ’ गटासाठी २०००, ‘ब’ गटासाठी १५०० आणि ‘क’ गटासाठी १००० रुपये मानधन आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात ट्रेझरीमध्ये ज्येष्ठ कलावंतांचे मानधन जमा होते. (प्रतिनिधी)
आॅनलाइन मानधनासाठी ज्येष्ठ कलावंतांचा असहकार
By admin | Published: April 27, 2015 2:04 AM