रत्नागिरी : लग्नाचे आमीष देत तब्बल १४ वर्षे एका महिलेची शारीरिक आणि मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक वर्षे दाद मागूनही पीडित महिलेची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाने मधु चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
हा प्रकार एका शिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची चर्चा आहे. २००२ ते २०१६ अशी चौदा वर्षे या पीडित महिलेचे शोषण करण्यात येत होते. तिला मधु चव्हाण यांनी लग्नाचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन देऊन त्यांनी गैरफायदा घेतल्याचे संबंधित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्याबाबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पीडित महिला अनेक वर्षे प्रयत्न करत होती. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याबाबत चौकशीही केली होती. मात्र हा तपास चालूच राहिला होता.
पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या महिलेने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानुसार चिपळूण न्यायालयाने मधु चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावर उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. या अर्जावर उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढताच हा अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चिपळूण पोलिसांना मधु चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करणे भाग पडले. भारतीय दंड विधान कलम ३७६ आणि ४२0 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी मधू चव्हाण यांनी आरोप करणारी महिला वारंवार खोट्या तक्रारी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.