जयंत धुळप,
अलिबाग- ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तिवेतन बिनधोक थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावे, नंतर त्या खात्यातून संबंधित खातेदारास पैसे सुरक्षितपणे काढता यावेत यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र निवृत्तिवेतनधारकांच्या हाताचे ठसे बायोमेट्रिक मशिनवर येत नसल्याने एक नवी समस्या ज्येष्ठ नागरिकांसमोर उभी राहिली आहे. या समस्येतून सत्वर मार्ग काढावा याकरिता अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागास निवेदने सादर केली आहेत.वयपरत्वे ज्येष्ठ नागरिकांच्या हाताच्या बोटांच्या नैसर्गिक रेषा झिजून अस्पष्ट व नामशेष झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधार कार्ड ज्या व्यक्ती अगर संस्थेकडून सध्या सरसकट दिली जातात त्यांच्याकडून जुन्या क्रमांकावर पण पुन्हा एकदा ठसे घेऊ न त्या कार्डाचा वापर केला तरी बोटांचे ठसे येत नाहीत. परिणामी आधार कार्डावरील ठसे जुळत नसल्याने कार्डधारक असलेली व्यक्ती उपरी ठरते. तिला शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे नातू यांनी सांगितले.आधारकार्डचे काम काही खासगी संस्थांच्या माध्यमातून होते. ते शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावे अशीही एक मागणी ज्येष्ठ नागरिकांची आहे. जेथे या आधारकार्डचे काम चालते तेथे ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे ठसे बायोमेट्रिक मशिन्सवर उमटले नाही तर ठशांची आधारकार्ड संलग्नता होत नाही. त्यावर संबंधित यंत्रणा कोणतीही उपाययोजना करु शकत नाही. अर्थात यामध्ये त्यांचाही दोष नसल्याची कल्पना ज्येष्ठ नागरिकांना आहे. परंतु येत्या काळात या समस्येत वाढ होणार आहे. एकतर बायोमेट्रिक मशिन्स बदलावी, अन्यथा ठसे रद्द करावे अशी उपाययोजना करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांची आहे.आधार कार्ड नसल्याने आपल्याला आपल्या निवृत्ती वेतनाचे पैसे बँक खात्यातून काढता येतील किंवा नाही अशी सुप्त भीती ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे. याबरोबरच वयपरत्वे दृष्टी आणि स्मृती कमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम कार्डचा पासवर्ड लक्षात राहात नाही तर मशिनवर पासवर्ड नोंदविणे अल्पदृष्टीमुळे शक्य होत नाही, याबाबत देखील या अनुषंगानेच शासकीय यंत्रणेने विचार करुन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के म्हणजे सुमारे एक ते सव्वालाख लोकसंख्या निवृत्ती वेतनधारक ज्येष्ठ नागरिकांची आहे. यापैकी सुमारे ४० ते ४५ टक्के निवृत्ती वेतनधारक ज्येष्ठ नागरिक हे वयोवृद्ध असून सद्यस्थितीत त्यांना या नव्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे नातू यांनी सांगितले.>स्मृतीच्या कमतरतेतूनही समस्याबायोमेट्रिक मशिनवर बोटांचे ठसे येत नसल्याने अनेक ज्येष्ठांना आधार कार्ड काढता आलेले नाही. मात्र सध्या सर्वच ठिकाणी आधारकार्डची सक्ती करण्यात आल्याने त्यांना बँक, पोस्ट, रेल्वे संदर्भातील कोणतेही काम करताना अडचणी येत आहेत. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बायोमेट्रिक मशिन तयार कराव्यात, अथवा या कार्यप्रणालीत बदल करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.