मुंबई/कडेगाव : राज्याच्या राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या अर्थकारणाला दिशा देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.त्यांच्या पश्चात पत्नी भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, चिरंजीव युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, ज्येष्ठ बंधू आमदार मोहनराव कदम, डॉ. शिवाजीरा कदम, रघुनाथराव कदम, जयसिंगराव कदम, आकाराम कदम, स्नुषा स्वप्नाली, मुलगी भारती महेंद्र लाड व अस्मिता राजेंद्र जगताप, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. कदम कुटुंबियांनी त्यांच्या उपचाराबाबत गोपनीयता बाळगली होती. निकटवर्तीय कार्यकर्ते, समर्थक तसेच काँग्रेसच्या पदाधिकाºयांनाही याबाबत माहिती नव्हती. भेटणा-यांची गर्दी वाढली तर उपचाराला अडथळे येतील, म्हणून ही माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती. मात्र त्यांच्या आजाराबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आजारातून ते सुखरुप बाहेर यावेत म्हणून जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, निकटवर्तीय लोक प्रार्थना करीत होते. अखेर या सर्वांनाच धक्का देणारी बातमी शुक्रवारी रात्री धडकली आणि अनेकांच्या डोळ््यात अश्रू उभे राहिले.
परखड आणि रोखठोक बोलण्यासाठी परिचित असलेले पतंगराव कदम राजकीय क्षेत्रात चाळीस वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत होते. काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या पतंगरावांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल २० वर्षाहून अधिक काळ अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. यामध्ये महसूल, उद्योग, सहकार, वने, पुनर्वसन व मदत, शिक्षण या खात्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे अनेकदा नाव आले. तत्परतेने आणि धाडसी निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची राज्यात छाप होती. आताच्या पलूस-कडेगाव (पूर्वीचा भिलवडी-वांगी) मतदारसंघातून तब्बल सहा वेळा ते निवडून आले. राज्याच्याच नव्हे तर देशातील राजकारणातही त्यांचा तितकाच दबदबा होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक तळागाळातून आलेला संवेदनशील मनाचा नेता गमावल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.- अंत्यसंस्कारत्यांचे पार्थिव शनिवारी पहाटे पुण्याकडे रवाना होणार आहे. पुण्यात त्यांच्या डेक्कन जिमखान्यावरील निवासस्थानी काही काळ ठेवल्यानंतर सकाळी ८ वाजता पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या त्यांच्या जन्मगावी पार्थिव आणण्यात येईल. त्यानंतर ४ वाजता चिंचणी येथील सोनहिरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.लाखोंचा पोशिंदा...भारती विद्यापीठ, भारती बँक, भारती रुग्णालय, भारती बझार, सोनहिरा व उदगिरी साखर कारखाना, सागरेश्वर व कृष्णा वेरळा सूतगिरणी अशा असंख्य संस्थांचे जाळे त्यांनी विणले. त्यात हजारो तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. भारती विद्यापीठात गोरगरिबांच्या मुलांना त्यांनी कोट्यवधीची शुल्क सवलत तसेच भारती रुग्णालयात आजारी रुग्णांना मोफत उपचाराची सोय करून दिली होती. ताकारी व टेंभू सिंचन योजनांच्या माध्यमातून पलूस आणि कडेगाव तालुक्यांत त्यांनी हरितक्रांती केली होती.प्रवास थक्क करणारासांगली जिल्ह्यातील सोनसळ या लहान खेड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. एकशिक्षकी शाळेत काम केले. नंतर त्यांनी तेथेच भारती विद्यापीठाची स्थापना केली. या संस्थेचे ते तहहयात कुलपती होते. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारे पतंगराव १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आणि अडीचशे मतांनी पराभूत झाले. १९८५ मध्ये त्यांनी पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा ते निवडून आले.कर्तृत्वाचा गौरव‘लोकश्री इन्स्टिट्यूट आॅफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यांनी सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल दिलेले ‘मानवता सेवा अवॉर्ड’, मराठा सेवा संघातर्फे शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिलेला ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्कार, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात आलेला ‘एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन’, ‘शहाजीराव पुरस्कार’, कोल्हापुरातील ‘उद्योग भूषण पुरस्कार’, ‘छत्रपती मालोजीराजे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पतंगराव कदम यांना गौरवण्यात आले.वक्तृत्वशैलीचा ठसापतंगराव कदम यांची वक्तृत्वशैली छाप पाडणारी होती. देशभरातील नेते त्यांना खुमासदार शैलीतील भाषणबाजीबद्दल ओळखत होते. कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना खळखळून हसविले नाही, असे कधीही झाले नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात केवळ पतंगरावांच्या भाषणासाठी लोक गर्दी करीत असत. मनमोकळ््या स्वभावामुळे त्यांच्या भाषणात कधी नाटकीपणा दिसला नाही. वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक सभा जिंकल्या. राज्यातील स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर होते. राष्टÑवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील आणि पतंगराव कदम या दोन्ही नेत्यांनी वक्तृत्वाच्या जोरावर राज्यात वेगळी छाप सोडली.