आपल्या खुमासदार शैलीतील लेखनाने मराठीपत्रकारिता आणि साहित्य विश्वात वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रांमधून पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मराठीमधील जवळपास सर्वच वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केलं. पत्रकारितेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या शिरीष कणेकर यांनी आपल्या लेखन शैलीच्या बळावर आपला खास असा वाचकवर्ग तयार केला होता. राजकारण, क्रीडा, सिनेमा, अशा विषयांवर त्यांनी केलेलं वृत्तपत्रांमधील स्तंभलेखन लोकप्रिय झालं होतं. कणेकरी, शिरीषासन आदी नावांनी त्यांचं विनोदी लेखन प्रसिद्ध झालं होतं. पत्रकारिता आणि साहित्यामधील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
६ जून १९४३ रोजी पुण्यात जन्मलेल्या शिरीष कणेकर यांचं मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पेण हे होतं. वडील मुंबईत रेल्वेमध्ये डॉक्टर असल्याने त्यांचं बालपण मुंबईतील भायखळा येथे गेलं. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सुरुवातीची वर्षे इंग्रजी वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केल्यानंतर ते मुक्त पत्रकार म्हणून लेखन करू लागले. त्यांनी क्रीडा, सिनेमा, राजकारण आदिंवर विपुल लेखन केलं. तसेच व्यक्तिचित्र, रहस्यकथा ललित लेखन असं चौफेर लेखन केलं. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.