मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपला रोखण्यासाठी एकमेकांचे शत्रु असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. आता पक्षविस्तारावर महाविकास आघाडीतील घटकपक्षांचा भर दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पक्षबांधणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शिवसेनेकडून ज्येष्ठ नेत्यांची फौज मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यातच शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. यामध्ये दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक केसरकर, सुनील राऊत या नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर आदित्य ठाकरे देखील कॅबिनेटमंत्री झाले आहेत. अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षसंघटनेला पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत. त्यामुळे पक्षसंघटनेची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर द्यायची योजना शिवसेनेने केल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारे अनेक नेते शिवसेनेकडे आहेत. हेच नेते आता शिवसेनेला घरोघरी आणि गावागावत पोहचविण्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचे समजते. यातून मध्यवधी निवडणूका जरी झाल्या तरी शिवसेना सज्ज राहू शकते.