शिरोळ : ज्येष्ठ समाजवादी आणि सहकार चळवळीतील जाणकार माजी आमदार डॉ. सातगोंडा रेवगोंडा ऊर्फ सा. रे. पाटील यांचे बुधवारी पहाटे बेळगावच्या केएलई रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. त्यांच्या निधनाने शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गेली ७० वर्षे सहकार आणि शेतीशी घट्ट नाते असलेला ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना २४ फेब्रुवारीला मेंदूच्या विकारावरील उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव बेळगावहून त्यांच्या जन्मगावी जांभळी (ता. शिरोळ) येथे आणण्यात आले. त्यानंतर ते जयसिंगपूर येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात नेण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता डॉ. पाटील यांचे पार्थिव मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात देण्यात आले. शिरोळ तालुक्यातील जांभळी हे सा. रे. पाटील यांचे मूळ गाव. त्यांनी १९४६मध्ये जांभळी विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत सहकारातून शेतकरी, कष्टकरी जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी ते अव्याहतपणे प्रयत्नशील होते. कोंडिग्रे येथील ‘श्रीवर्धन बायोटेक’ हा जागतिक फूल उत्पादनाचा प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनाखालीच निर्माण झाला. एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन यांच्या विचारांच्या प्रभावातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. १९७०मध्ये श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून ते पदावर गेले. कारखान्याला राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून त्यांनी १९५७मध्ये व त्यानंतर १९९९मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर गेले होते. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ नेते सा. रे. पाटील यांचे निधन
By admin | Published: April 02, 2015 3:08 AM