बारामती: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीत राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट सांगावे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको आहे. राज्य शासनाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उरलं आहे, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
बारामती तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडवणीस यांचा पाहणी दौरा सोमवारी(दि १९) १०.१५ वाजता सुरु झाला. सुरवातीला फडवणीस यांनी जिरायती भागातील उंडवडी. क.प. येथे भेट देत पाहणी केली. सकाळी १० वाजता येथील विमानतळावर खासगी विमानाने फडवणीस यांचे आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडवणीस यांनी हा टोला लगावला. तुळजापूर येथे ज्येष्ठ नेते पवार यांनी मुख्यमंत्री घरातून का काम करतात,असा पत्रकारांशी प्रश्न केला .त्यावर एकाच ठिकाणी थांबुन काम करण्यासाठी आम्हीच त्यांना विनंती केल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर फडवणीस यांनी पत्रक़ारांशी बोलताना ज्येष्ठ नेते पवार यांना हा टोला लगावला.
फडणवीस म्हणाले, राज्याचा नाकर्तेपणा समोर येत आहे. आमचा दौरा घोषित झाल्यावर सगळे पालक मंत्री जनतेच्या भेटीला गेले.शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. सरकारने प्रथम शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. राज्यपालांबरोबर यापूवीर्ही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नाही. शेतकऱ्याला काय मदत मिळणार ,असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. केंद्राची वाट न बघता राज्यानं मदत करावी,असा सल्ला देखील त्यांनी दिला.
दरम्यान बारामती येथे आमदार गोपिचंद पडळकर, राहुल कुल,जयकुमार गोरे यांच्यासह बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे,प्रशांत सातव, पांडुरंग कचरे, अविनाश मोटे, गोविंद देवकाते,माऊली चवरे,गजानन वाकसे ,सतीश फाळके आदींनी फडवणीस यांचे स्वागत केले.यावेळी फडवणीस साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो,या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान बारामती येथील दौऱ्यानंतर फडणवीस दौंड , इंदापूर येथील पाहणी दौऱ्यावर रवाना झाले .—————————————————