मुंबई - नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.२४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
प्रदीप भिडे यांनी सुरुवातीला एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले होते. त्यानंतर ते रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून नाट्यक्षेत्राशी जोडले गेले होते. त्यानंतर प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनमधून वृत्तनिवेदनास सुरुवात केली. प्रदीप भिडे यांनी शेकडो कार्यक्रम, सभा यांचे सूत्रसंचालन केले होते. तसेच त्यांनी हजारो जाहिरातींनाही आवाज दिला होता.
प्रदीप भिडे यांचे आई-वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. तिथे विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर रानडेमधून त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.