ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - मराठी साहित्य विश्वातले ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचे विलेपार्ले पूर्वेकडील विजयानंद सोसायटी येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते मधुमेहाने आजारी होते.नलेश पाटील यांचा जन्म २९ जानेवारी १९५४ रोजी मुंबई येथे झाला. पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या जे.जे. इन्स्टिटयूट आॅफ अप्लाईड आर्ट या संस्थेत झाले. त्यानंतर त्यांनी एका अमेरिकन कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नोकरी केली. हमाल दे धमाल, टूरटूरसाठी त्यांनी गीतलेखन केले होते.ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र यांच्यासोबत नलेश पाटील यांनी ‘कवितांच्या गावा जावे’ या उपक्रमातून काव्यवाचनाचा कार्यक्रम केला. कविवर्य ना.धो. महानोरांनंतर निसर्ग कविता वेगळ्या उंचीवर घेवून जाणारे कवी म्हणून नलेश पाटील यांची ओळख होती.----------------नलेश आमच्या पालघर जिल्ह्याचा मोठा निसर्ग कवी होता. पाऊस, डोंगर, हिरवाईच्या शोधात आणि प्रेमात असलेल्या रसिक प्रिय कवीला आम्ही मुकलो आहोत.- अशोक मुळे, डिंपल प्रकाशन.......................डोळ्याच्या पाणवठ्याला निळं आभाळ ठेपलं. नलेश पाटील... तुमची आठवण येत राहिल..- विजू माने, लेखक व दिग्दर्शक...........................सोशल मीडियावर श्रद्धांजली‘घन आभाळीचा तडकावा, मातीस मिळावा शिडकावा, झाडावरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा...’ या नलेश पाटील यांच्या ओळी शेअर करत नेटकऱ्यांनी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.