ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ३० - 'भारतीय जनता युवा मोर्चाचा (भाजयुमो) माजी मुंबई अध्यक्ष गणेश पांडेवर वरिष्ठांचा वरदहस्त आहे', असा आरोप गैरवर्तन केल्याची तक्रार करणा-या मैथिली जावकर यांनी केला आहे. 'गणेश पांडेविरोधात बोलण्यास इतर लोक घाबरतात, माझ्या बाजूने कोणीही बोलणारं नव्हत. त्यादिवशी काय झालं होतं, हे फक्त प्रियदर्शनी सोहोनीला माहित होतं. गप्प राहण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता, मी काहीही करु शकत नव्हते', असं मैथिली जावकर बोलल्या आहेत. गणेश पांडेविरोधात गैरवर्तनाची तक्रार केल्यानंतर प्रथमच मैथिली जावकर यांनी समोर येत आपलं म्हणण मांडलं आहे.
एबीपी माझा दिलेल्या मुलाखतीत मैथिली जावकर यांनी आपली बाजू मांडली आहे. गणेश पांडेने नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे त्याला उत्तर देत मैथिली जावकर यांनी 'माझी, गणशे पांडे आणि तिथे असणा-या सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे. यामध्ये विणा दिवेकर, योगेश गीरकर, हिमांशू पडवळ, अमित शेलार,अमोल जाधव,निर्माला यादव, सिद्धार्थ शर्मा यांची नावं घेत या सर्वोच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.
'गणेश पांडे गैरवर्तन करत असताना भीतीमुळे कोणीही समोर आलं नाही. आशिष शेलार यांनी मला आणि गणेश पांडेला बोलावून आमचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. दोघांची बाजू ऐकल्यानंतर आशिष शेलार यांनी गणेश पांडेचा राजीनामा घेतला होता. गणेश पांडेवरील कारवाईनंतर समाधानी होते, पण त्यांनी सार्वजनिकरित्या आरोप केल्यावर तक्रार करणार असल्याचं', मैथिली जावकर बोलल्या आहेत. 'गणेश पांडेचे अंडरवर्ल्डशी संबंध,गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्या भीतीनेच मी तक्रार केली नाही', असंही मैथिली जावकर बोलल्या आहेत.
काय आहे प्रकरण -
4 ते 6 मार्च दरम्यान देशभरातील भाजयुमोच्या संघटनेची राष्ट्रीय पातळीवर एक परिषद मथुरा येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी मुंबई भाजयुमोचा अध्यक्ष गणेश पांडेसह उपाध्यक्षा असलेल्या मैथिली जावकर सहभागी झाल्या होत्या. परिषदेसाठी गेलेले सर्व पदाधिकारी एकाच हॉटेलात थांबले होते. त्याच रात्री पांडेने आपल्याला त्याच्या खोलीत बोलावून घेतले. त्यानंतर त्याने अश्लील भाषेचा वापर करत आपला विनयभंग केला, अशी तक्रार मैथिली जावकर यांनी आशिष शेलार यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.